नगर – पुण्याहून नगरच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या मारुती सेलेरिओ कारने पुढे रस्त्याच्या कडेने पायी चाललेल्या युवकाला पाठीमागून जोराची धडक दिल्याने गंभीर जखमी होवून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नगर पुणे महामार्गावर चास (ता.नगर) गावच्या शिवारात असलेल्या भोलेनाथ हॉटेल समोर मंगळवारी (दि.) सकाळी ८ च्या सुमारास घडली.
ऋतिक बिभीषण पठारे (वय २४, रा.हवेली, जि. पुणे) असे मयत युवकाचे नाव आहे. मयत ऋतिक व त्याचा सहकारी मंगेश बाळासाहेब रायकर हे दोघे मंगळवारी सकाळी चास शिवारात असलेल्या हॉटेल भोलेनाथ समोरून रस्त्याच्या कडेने पायी जात असताना पुण्याहून नगरच्या दिशेने भरधाव वेगात आलेल्या मारुती सेलेरिओ कारने यातील ऋतिक यास पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामुळे तो रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर कार चालक तेथून पसार झाला. याबाबत मंगेश रायकर यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.