अहिल्यानगर -मद्यधुंद अवस्थेत भरधाव टेम्पो चालवणार्या चालकामुळे तीन वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी (3 डिसेंबर) सायंकाळी सहाच्या सुमारास केडगाव उपनगरातील रॉयल इनफिल्ड शोरूमच्या गेट समोर घडली. स्वराज संभाजी महारनवर असे मयत बालकाचे नाव आहे. याप्रकरणी मयत स्वराजचे वडिल संभाजी रामदास महारनवर (वय 34 रा. शिक्षक कॉलनी, मोहिनीनगर, केडगाव, मुळ रा. धामणगाव, ता. जामखेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चालक शंकर उर्फ शेखर राघु मोरे व किंनर चंद्रकांत दत्ताराम जपकर (दोघे रा. नेप्ती, ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांनी त्यांच्या ताब्यातील मारूती सुझुकी कंपनीच्या सुपर कॅरी टेम्पो (एमएच 12 डब्ल्यूएक्स 2059) मद्यधुंद अवस्थेत चालवून स्वराजला धडक दिली. फिर्यादीच्या पत्नी कल्याणी महारनवर या मंगळवारी सायंकाळी कामावरून परतत असताना मुलगा स्वराज त्यांच्या कडेवर होता. त्या इंडस्ट्रीयल एरीयातील रॉयल इनफिल्ड शोरूमच्या गेट समोर आल्या असता चालकाने भरधाव वेगाने टेम्पो चालवून कल्याणीला धडक दिली. या धडकेत त्यांच्या कडेवर असलेला स्वराज गंभीर जखमी होवून त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, टेम्पो चालकाने कल्याणी यांना धडक दिल्यानंतरही त्याने तेथे असलेल्या इतर लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशा पध्दतीने टेम्पो चालविला. चालक शंकर उर्फ शेखर मोरे हा मद्यधुंद अवस्थेत असल्याने हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, सहायक पोलीस निरीक्षक विकास काळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास सहायक निरीक्षक काळे करत आहेत.