सरकारी अधिकारी तसेच कर्मचारी सर्रास लाच घेत असल्याचं समोर येतंय. अशा लाचखोरांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधन विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे. गुरुवारी (ता. १५) पुण्यात एका सरकारी वकील महिलेला १० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलंय.अंजला नवगिरे (वय ५४) असं या लाचखोर महिला वकीलाचं नाव आहे. तिच्याविरोधात वानवडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात एका महिलेने (वय ३६) तक्रार दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या पतीविरुद्ध शहरातील हडपसर (Pune News) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात वापरलेली मोटार पोलिसांनी जप्त केली होती. ती मोटार परत मिळवण्यासाठी तक्रारदार महिलेने लष्कर न्यायालयात अर्ज केला होता.न्यायालयाने या अर्जावर सरकारी वकील अंजला नवगिरे यांना म्हणणे मांडण्यास सांगितले. यादरम्यान, तक्रारदार महिलेने सरकारी नवगिरे यांची भेट घेतली. त्यावेळी नवगिरे यांनी तक्रारदाराकडे 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात धाव घेत याची माहिती दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून वकील नवगिरे यांना 10 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.