नगर तालुक्यातील तांदळी वडगाव शिवारात ठोंबरे वस्तीवर राहणाऱ्या तरुण शेतकऱ्याने शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.२२) पहाटे घडली. किरण पोपट ठोंबरे (वय ३२, रा. तांदळी वडगाव, ता.नगर) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
किरण ठोंबरे याने बुधवारी (दि.२२) पहाटे १२.५० वाजण्याच्या सुमारास शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला.हे समजताच त्याचा चुलत भाऊ लक्ष्मण शिवाजी ठोंबरे व इतर नातेवाईकांनी त्यास उपचारासाठी तातडीने नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. मात्र तेथील मेडिकल ऑफिसर डॉ.ढोरे यांनी त्यास तपासून उपचारापूर्वीच मयत घोषीत केले.
ही माहिती दवाखाना ड्युटीवर असलेले तोफखाना पोलीस स्टेशनचे अंमलदार जठार यांनी नगर तालुका पोलिसांना कळविली. या खबरे वरून पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. किरण याने आत्महत्या का केली याचा तपास पो.हे.कॉ. थोरात करीत आहेत. मयत किरण याच्या पश्चात आई वडील, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी, बहिण असा परिवार आहे. तरुण शेतकऱ्याच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.