नगर तालुका – अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना तरूणाने घरात घुसून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना २५ ऑक्टोबर रोजी नगर-सोलापूर रस्त्यावरील एका गावात घडली. अत्याचार केल्याने पीडित मुलगी गर्भवती राहिली आहे. तीने मंगळवारी (दि. ५) दुपारी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून किरण बाबासाहेब ऊर्फ मारूती शिंदे (रा. उक्कडगाव ता. नगर) याच्याविरोधात अत्याचार, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अल्पवयीन मुलगी नगर-सोलापूर रस्त्यावरील एका गावात आई-वडिलासह राहते. ती २५ ऑक्टोबर रोजी घरी एकटीच असताना तिच्या ओळखीचा किरण बाबासाहेब ऊर्फ मारूती शिंदे याने घरात प्रवेश केला. मुलगी त्याला म्हणाली,‘घरात कोणी नाही, तू येथे थांबू नको’. त्यावर किरण मुलीला म्हणाला,‘तु मला फार आवडते, तुझ्यासोबत मला लग्न करायचे आहे’, असे म्हणून घरातील बेडरूम मध्ये तिच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून इच्छेविरूध्द अत्याचार केला.
दरम्यान, अत्याचार केल्याने पीडिता गर्भवती राहिली असल्याने तिने तिच्यासोबत झालेला सर्व प्रकार घरी सांगितला. त्यानंतर मंगळवारी भिंगार कॅम्प पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी पीडितेची फिर्याद नोंदवून घेत किरण बाबासाहेब ऊर्फ मारूती शिंदे याच्या विरोधात अत्याचार, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन अधिक तपास करीत आहेत.