अहमदनगर-बदलापूर येथे दोन चिमुकल्या मुलींवर एका नराधमाने अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील विद्यालयामध्ये बाहेरील तरुणाने अकरावीत शिकणार्या मुलीला मारहाण केल्याची घटना घडली. दरम्यान, विद्यालयाची बदनामी होऊ नये म्हणून पोलिसांसमक्ष संबंधित तरुणाचा माफीनामा लिहून घेत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न शाळा व्यवस्थापकाकडून झाला आहे.
बदलापूर येथील घडलेल्या प्रकारानंतर संपूर्ण राज्यातून संतापाची लाट उसळली आहे. शाळा, विद्यालय परिसरात कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक नियमावली आखली जात आहे. परंतु तिसगाव याठिकाणी बाहेरचा तरुण विद्यालयात येऊन विद्यार्थिनीला मारहाण करून निघून जातो मग शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी खरंच शाळेत तरी सुरक्षित आहेत का? असा देखील प्रश्न या प्रकारावरून निर्माण होऊ लागला आहे. तिसगाव येथे परिसरातील पंधरा-वीस गावचे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात परंतु नेहमीच याठिकाणी बाहेरील तरुण विद्यालय परिसरामध्ये वावरताना दिसतात. या तरुणांकडून अनेकवेळा शालेय मुलींची छेड काढण्याचा प्रकार झाल्याच्या घटना अनेक वेळा घडलेल्या आहेत.
छेड काढण्याचे प्रकार नेहमीच घडत असल्यामुळे अनेक मुलींनी इतर सुरक्षित ठिकाणी शिक्षण घेण्याचा मार्ग स्वीकारला आहे तर काही पालकांनी आपल्या मुलींची शाळाच बंद केल्याची चर्चा आहे. शाळेत येऊन विद्यार्थिनींची छेड काढण्याचे प्रकार यापूर्वी देखील घडलेले आहेत. आणखी अशा पद्धतीच्या किती घटना घडल्यानंतर शाळा व्यवस्थापनाला जाग येणार आहे आणि अशा प्रकरणांबाबत ठोसपणे कारवाई करण्याची भूमिका घेणार अशी देखील चर्चा आता पालकांमधून सुरू झाली आहे.