संगमनेर-शाळा-महाविद्यालयात जाणार्या विद्यार्थिनींच्या रस्त्यावर थांबून परप्रांतीय विकृत तरुण संपूर्ण नग्न होत अश्लील वर्तन करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुकेवाडी रस्त्यावर गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या प्रकाराबाबत ग्रामस्थांना समजताच त्यांनी गुरुवारी (दि. 12) सकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास या तरुणास पकडून शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की मूळ उत्तर प्रदेश राज्यातील परंतु सुकेवाडी येथे राहत असलेला शाहरुख गुलाबनबी अन्सारी हा विकृत तरुण गेल्या दीड महिन्यापासून सुकेवाडी रस्त्यावरुन शाळा-महाविद्यालयांत जाणार्या विद्यार्थिनींसमोर नग्न होवून अश्लील वर्तन करत असायचा. मात्र, गुरुवारी सकाळी ग्रामस्थांना हा गंभीर प्रकार समजताच त्याला त्याच अवस्थेत गाठून पकडले. त्यानंतर पोलिसांना याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत त्यास ताब्यात घेतले.
याप्रकरणी शहर पोलिसांनी विकृत तरुण शाहरुख गुलाबनबी अन्सारी याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोहेकॉ. सी. ए. गोंदके करत आहेत.