अहमदनगर- दोन दुचाकींच्या धडकेत ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शेंडी बायपास रस्त्यावरील व्दारकादास शामकुमार कपड्याच्या दुकानासमोर शनिवारी (दि.२) सायंकाळी घडली. अमोल पवार (वय ३२, रा. वरवंडी ता. राहुरी) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शनिवारी सायंकाळी अमोल पंवार हे त्यांच्या दुचाकीवरून बायपास रस्त्याने जात असताना व्दारकादास शामकुमार कपड्याच्या दुकानासमोर त्यांच्या दुचाकीला समोरील दुचाकीने धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या अमोल पवार यांना उपचारासाठी विळद घाटातील विखे पाटील हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. दरम्यान तेथील डॉक्टरांनी अमोल पवार याला उपचारापूर्वीच मयत घोषित केले. तेथील डॉक्टरांनी याबाबत एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस अंमलदार थोरवे करीत आहेत.