नगर – पुणे महामार्गावर चास (ता. नगर) घाट वळणावर भरधाव वेगातील कारच्या चालकाचे कार वरील नियंत्रण सुटून डिव्हायडर क्रॉस करून कार दुसऱ्या बाजूने येणाऱ्या कारवर आदळून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. १) पहाटे अडीचच्या सुमारास घडली आहे. ब्रजेशकुमार (पूर्ण नाव माहिती नाही, रा. एअर फोर्स स्टेशन, सुब्रतो पार्क, नवी दिल्ली) असे मयत तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी सोहेल रहिम शेख (वय २७ रा. पाचोड, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्रजेशकुमार याने त्याच्या ताब्यातील कार रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवून डिव्हायडर क्रॉस करून फिर्यादी सोहेल शेख यांच्या ताब्यातील कारवर आदळून अपघात केला. त्यानंतर ती कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात आदळल्याने कारचालक ब्रजेशकुमार गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.