अहमदनगर -राहाता तालुक्यातील शिंगवे येथील मिलिंद जनार्दन जाधव (वय 42) या तरुणाचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी घडल्याने ऐन पोळा सणाचे दिवशी शिंगवे गावावर शोककळा पसरली. मिलिंद जाधव हे शेतकरी कुटुंबातील असून नेहमीप्रमाणे पोळा सण असल्याने सकाळपासून गायी धुणं व रंगरंगोटी करण्याचे कामात व्यस्त होते.
त्यांनी मारुती व म्हसोबा मंदिरात जाऊन देवांना नारळ फोडले व पूजा अर्चा करून घरी गेले. घराचे पाठीमागे गेले असता पावसाची संततधार सुरू असल्याने पोलवरील विजेच्या तारेचा प्रवाहास त्यांचा संपर्क आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घरातील कुटुंबियांनी एकच आरडाओरडा केला. त्यांना ताबडतोब शिर्डी येथील साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता त्यास मयत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.