अहमदनगर-लव्ह मॅरेजला मदत केली म्हणून चौघांनी तरुणाला लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. गणेश संजय साठे (वय 25 रा. भावनाऋषी सोसायटी, कल्याण रस्ता, नगर) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांच्यावर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी उपचारादरम्यान दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रवीण सिताराम लोखंडे, महादु सिताराम लोखंडे, हिराबाई सिताराम लोखंडे, बायडी रमेश शिंदे (सर्व रा. भावनाऋषी सोसायटी, कल्याण रस्ता, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. बहिणीचा साखरपुडा असल्याने गणेश हे 27 ऑगस्ट रोजी दुपारी अडीचच्या सुमारास शहरातील श्रुतीका कलेक्शन येथे साड्या खरेदी करण्यासाठी गेले होते. तेथे प्रवीण लोखंडे आला व त्याने गणेश यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ‘तुझ्या मामाने माझ्या भाची सोबत आळंदी (जि. पुणे) येथे जावून लव्ह मॅरेज केले. त्यास तुम्ही मदत केली आहे’ असे म्हणून तो गणेश यांना त्यांच्या गल्लीत घेऊन गेला.
तेथे त्याचा भाऊ महादू सिताराम लोखंडे आला व त्याने गणेश यांना पकडून ठेवले व प्रवीण लोखंडे याने दांडक्याने मारहाण केली. त्यात त्यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. तसेच हिराबाई लोखंडे व तिची मुलगी बायडी शिंदे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. गणेश यांच्या आईला देखील मारहाण करण्यात आली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जखमी गणेश यांनी रुग्णालयात दिलेल्या जबाबावरून सोमवारी सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे.