अहमदनगर -गाडीचा धक्का लागल्याच्या कारणातून तरूणाला मारहाण करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना वाळकी (ता. नगर) शिवारात गुरूवारी (दि. 21) रात्री घडली. आप्पासाहेब लांडगे (रा. बाबुर्डी घुमट ता. नगर) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी अलका लांडगे यांनी शुक्रवारी (दि. 22) रात्री नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चौघांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरूण पिराजी बोठे, प्रविण ऊर्फ पंकज अरूण बोठे, मनोज राधाकिसन भालसिंग व इंदूबाई अरूण बोठे (सर्व रा. वाळकी, ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. गुन्हा दाखल होताच नगर तालुका पोलिसांनी प्रविण ऊर्फ पंकज अरूण बोठे याला ताब्यात घेतले आहे. आप्पासाहेब लांडगे हे वाळकी येथील कापड दुकानात काम करत होते. ते गुरूवारी सकाळी कामावर गेले होते. सायंकाळी कामावरून घरी येत असताना वाळकी येथील शाळेजवळ त्यांच्याकडून बोठे कुटुंबातील नातेवाईकाला गाडीचा धक्का लागला. याच कारणातून आप्पासाहेब यांना मारहाण करण्यात आली.
दरम्यान, आपला पती कामावरून अजून घरी आला नाही म्हणून फिर्यादीने त्यांच्या मोबाईलवर फोन केला असता आप्पासाहेब यांना मारहाण होत असल्याचे त्यांना समजताच फिर्यादी यांनी पुतण्याला घटनास्थळी पाठवले असता आप्पासाहेब याचा अपघात झाला असल्याने तो बेशुध्द झाला असल्याचे तेथील लोकांनी सांगितले. फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांनी अधिक माहिती घेतली असता गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून चौघांनी आप्पासाहेब यांना मारहाण केल्याचे समोर आले असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रणजित मारग करीत आहेत.