महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका १९ वर्षीय युवतीला एका तरुणाने वारंवार फोन करून प्रेमसंबंध ठेवण्यास सांगत तसे न केल्यास फोटो व्हायरल करून नातेवाईकांत व समाजात बदनामी करण्याची धमकी दिल्याने या सततच्या त्रासाला कंटाळून त्या युवतीने कॉलेजच्या होस्टेल मध्ये गळफास घेत आत्महत्या केली होती. या प्रकरणी आरोपी श्रीराम अर्जुन पवार (रा. कौडगाव जांब, ता.नगर) याच्यावर शुक्रवारी (दि.५) सायंकाळी पारनेर पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्या जयसिंग कर्डिले (वय १९, रा. श्रमिक नगर, सातपूर, नाशिक) असे मयत युवतीचे नाव आहे. ती पारनेर तालुक्यतील कर्जुले हर्या येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती व तेथेच होस्टेल मध्ये राहात होती. आरोपी श्रीराम पवार हा सातत्याने तिला फोन करून त्याच्याशी प्रेमसंबंध ठेवण्याबाबत धमकावत होता. तु जर माझ्याशी प्रेमसंबंध ठेवले नाही तर तुझे फोटो व्हायरल करील, नातेवाईक आणि समाजात तुझी बदनामी करील अशी धमकी तो देत होता.
या त्रासाला कंटाळून विद्या हिने सोमवारी (दि.१) रात्री होस्टेलच्या रूम मध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत तिचे मामा गणेश माधव लवांडे (रा. पारेवाडी, ता. पाथर्डी) यांनी शुक्रवारी (दि.५) पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी श्रीराम पवार याच्या विरुद्ध विद्या हिस आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी भा.दं.वि.कलम ३०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.