अहमदनगर – बायको, सासू आणि बायकोचा लग्नापूर्वीपासून असलेला प्रियकर यांच्या सततच्या त्रासाला कंटाळून ३० वर्षीय युवकाने नगरच्या रेल्वेस्टेशन जवळील पुलावरून खाली उडी मारत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या युवकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पोलिसांनी बायको, सासू व बायकोचा प्रियकर या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
विशाल दादा जगधने (वय ३०, रा. इंगळे वस्ती, रेल्वे स्टेशन पाठीमागे, अहमदनगर) असे मयत युवकाचे नाव आहे. त्याने दि. ८ जून रोजी नगरच्या रेल्वेस्टेशन जवळील पुलावरून खाली उडी मारत आत्महत्या केली होती. या प्रकरणी प्रारंभी लोहमार्ग पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर मयत विशाल चे वडील दादा आनंदा जगधने यांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली की, मयत विशाल याने त्याची बायको भारती विशाल जगधने (रा. इंगळे वस्ती, रेल्वे स्टेशन पाठीमागे, अहमदनगर), सासू सुनिता अशोक नेटके (रा. रामवाडी,अहमदनगर) व बायकोचा लग्नापूर्वी पासूनचा प्रियकर सनी प्रल्हाद साबळे (रा. रामवाडी, अहमदनगर) यांच्या सततच्या छळाला कंटाळून ही आत्महत्या केलेली आहे.
हे सर्व जण त्याच्यावर घटस्फोटासाठी दबाव आणत त्याला त्रास देत होते. त्याची बायको भारती ही दि.२९ मे रोजी त्याला काही न सांगता मुलांना घेवून घरातून माहेरी निघून गेली होती. या पूर्वी ही भारती तिचा प्रियकर सनी सोबत अनेकदा घरातून निघून गेलेली होती. त्याबाबत तिला जाब विचारला तर भारती व सनी हे दोघेही त्याला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत असत.
दि.२४ मे रोजी सनी याने त्याला मारहाण केली होती. याबाबत त्याने कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा ही दाखल आहे. तसेच त्याच्यावर दहशत निर्माण करण्यासाठी त्याला मारायला अनेकदा मुले पाठविली होती. सातत्याने होणाऱ्या या त्रासाला कंटाळून विशाल याने आत्महत्या केल्याचे या फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी तिघांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.