नगर – सरला बेट चे महंत रामगिरी महाराज व भाजपा आ. नितेश राणे यांच्या दि. २ सप्टेंबर रोजीच्या भेटीचे फोटो स्टेट्सला ठेवल्याने त्याचा राग येवून चौघांनी महाविद्यालयाच्या गेटवर युवकावर चॉपर, फायटर ने हल्ला करत कंबरेच्या बेल्ट ने गळा आवळून त्याचा खुन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना श्रीरामपूर येथील आर बी एन बी कॉलेजच्या गेटवर बुधवारी (दि.४) सकाळी १०.१५ च्या सुमारास घडली.
याबाबत प्रदीप भागीनाथ विठेकर (वय १७, रा. वांजरगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजी नगर) याने श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी रिजवान शेख व त्याच्या ३ अनोळखी साथीदारांच्या विरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी विठेकर हा श्रीरामपूर येथील आर बी एन बी कॉलेज मध्ये शिक्षण घेत आहे. त्याने त्याच्या सोशल मिडीयाच्या स्टेट्सला सरला बेट चे महंत रामगिरी महाराज व भाजपा आ. नितेश राणे यांच्या दि. २ सप्टेंबर रोजीच्या भेटीचे फोटो ठेवले होते.
याचा राग येवून रिजवान शेख व त्याच्या ३ अनोळखी साथीदारांनी प्रदीप याला बुधवारी (दि.४) सकाळी १०.१५ च्या सुमारास कॉलेजच्या गेटवर अडवून त्याला कंबरेच्या बेल्ट ने तसेच चॉपर, फायटरने मारहाण करून जखमी केले. तसेच बेल्टने त्याचा गळा आवळून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंके हे करीत आहेत.