छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना असा राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात आंदोलने करीत आहेत. यावरून सत्तार यांनी भाजपला कडक शब्दात इशारा दिला आहे.
अब्दुल सत्तार यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असं म्हटलं आहे. महायुतीमध्ये असलेले भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आम्हाला विरोध करीत आहे. ज्या पद्धतीने आम्हाला विरोध केला त्या पद्धतीने शिवसैनिक त्यांना विरोध करतील. ते आम्हाला ज्या पद्धतीने वागणूक देतील, अगदी त्याच पद्धतीने आम्हीही त्यांना उत्तर देऊ, असंही सत्तार म्हणाले.
अब्दुल सत्तार सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातून 3 वेळा निवडून आले आहेत. या तिन्ही वेळा त्यांनी भाजप उमेदवारांचा पराभव केला आहे. सत्तार २०१४ साली काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. २०१९ विधानसभेपूर्वी ते भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक होते. मात्र, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रवेशाला विरोध केला.शेवटी सत्तार यांनी शिवसेनेची कास धरली. त्यावेळी शिवसेना-भाजपमध्ये युती होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या आग्रहाखातर भाजपने ही जागा शिवसेनेला सोडली. २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत सत्तार यांनी भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. तेव्हापासून सिल्लोडमध्ये सत्तार विरुध भाजप असा राजकीय सामना रंगला आहे.
आता आगामी विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना गेल्या महिनाभरापासून सिल्लोडमध्ये भाजप कार्यकर्ते आणि नेते हे सत्तार विरोधात आंदोलन करीत आहेत. तर सत्तार समर्थक हे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे विरोधात आंदोलन करीत आहेत. त्यामुळे महायुतीतील शिवसेना आणि भाजपमध्ये वाद उफाळून आला आहे. त्यावर आता सत्तार यांनी भाजप कार्यकर्त्यांविरोधात दंड थोपटले आहे.