शेवगाव (प्रतिनिधी) : शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून १ कोटी १ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या आणखी एका आरोपीस शेवगाव पोलिसांनी सापळा लावून मध्यप्रदेश येथून जेरबंद केले आहे. कैलास दत्तात्रय भागवत (रा.एरंडगाव, ता. शेवगाव)याच्याविरोधात कृष्णा बाजीराव भागवत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी २९ जुलै रोजी फसवणूक व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. या आरोपीने फिर्यादी व साक्षीदारांचा विश्वास संपादन करून शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली १ कोटी १ लाख रुपयांची फसवणूक केली होती. या संदर्भात पोलिस निरीक्षक समाधान नागरे यांना मिळालेल्या माहितीवरून इंदूर (मध्यप्रदेश) येथे दडून बसलेल्या आरोपींच्या मुसक्या शेवगाव पोलिस पथकाने आवळल्या.
इंदूर येथील चिकिस्सानगर येथील लॉजमध्ये राहणाऱ्या आरोपीस लसुडीया पोलिसांच्या मदतीने बुधवारी दि १८ रोजी ताब्यात घेतले. त्यास शेवगाव पोलिस ठाण्यात आणून संबंधित गुन्ह्यांत अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक समाधान नागरे, सहायक पोलिस निरीक्षक विशाल लहाणे, पोलिस हेड कॉन्स्टेबल परशुराम नाकाडे, मोहिते, श्याम गुंजाळ, संतोष वाघ, राहुल खेडकर, बाप्पासाहेब धाकतोडे,राहुल गुंडू यांनी केली.