अहमदनगर-शनिवारपासून जिल्ह्यात शाळा सुरू झाल्या. मात्र, शाळा सुरू होण्यापूर्वी जिल्हा पातळीवरून मोफत पाठ्य पुस्तके तालुका पातळीवर वेळेत पोहच करण्यात आले होते. त्याठिकाणाहून पाठ्य पुस्तके हे शाळास्तरावर थेट पाठवणे अपेक्षीत होते. मात्र, याबाबत वारंवार सुचना वजा आदेश देवून देखील अनेक तालुक्यात शिक्षकांना केंद्र शाळा पातळीवरून पुस्तकांचे वितरण करण्यात आले. यामुळे पुस्तक वितरणात अनियमितता झाली. यामुळे काही शाळांमध्ये पुस्तके पोहचलीच नाहीत. यामुळे पाठ्य पुस्तक वितरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून दोषी आढळणार्या गटविकास अधिकार्यांवर कारवाई करण्याचा इशारा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी दिला आहे.
जिल्ह्यात 15 जूनपासून शाळा सुरू झाल्या. पहिली ते आठवीपर्यंत शासकीय आणि अनुदानीत शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येते. यासाठी गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा परिषद शिक्षण विभागात पातळीवर काटेकोर नियोजन करण्यात आले. तसेच तालुका पातळीपर्यंत शाळा सुरू होण्याच्या आधीच 100 टक्के पाठ्य पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला. तालुका पातळीवर आलेली पाठ्य पुस्तके ही गटशिक्षणाधिकारी यांनी शाळा पातळीवर पोहच करण्यासाठी नियमाप्रमाणे खासगी वाहतूक करणार्या वाहनाची निविदा प्रक्रिया करून त्यानूसार शाळा पातळीवर पोहचवे आवश्यक होते. याबाबत जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी यांना वारंवार सुचना देण्यात आल्या. तसेच लेखी पत्र पाठवण्यात आले.
मात्र, तालुका पातळीवर गटशिक्षणाधिकारी यांनी तालुका मोफत पाठ्य पुस्तके ही केंद्र शाळांपर्यतच पाठवली.
त्याठिकाणाहून शिक्षकांना त्यांच्या स्वत:च्या वाहनाने ही पाठ्य पुस्तके शाळा पातळीवर पोहच करण्यास सांगण्यात आले. यामुळे पुस्तकांच्या वितरणात मोठा घोळ झाला. काही ठिकाणी जादा पुस्तके तर काही ठिकाणी एकही पुस्तक पोहचलेले नाही. यामुळे अनेक तालुक्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना ना नवीन गणवेश, ना पाठ्यपुस्तक अशी स्थिती होती. याबाबतची माहिती शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या कानावर आली आहे. यामुळे त्यांनी तालुका पातळीवरून वाटप करण्यात आलेल्या पाठ्य पुस्तकांच्या वितरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. यात अनियमिता आढळणार्या गटशिक्षणाधिकारी यांच्यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय पाटील यांनी घेतला आहे.