Monday, September 16, 2024

बायकोला सांगीतलं ‘ही शेवटची.’…त्या दिवसापास्नं दारू सुटलीये… अभिनेता किरण मानेंचा किस्सा

मराठी मालिका आणि नाटक क्षेत्रात अभिनेते किरण माने यांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत. ‘मुलगी झाली हो’ ही त्यांची मालिका चांगलीच गाजली होती. अभिनयासोबतच ते त्यांच्या बेधडक मतांसाठी ओळखले जातात. एक किस्सा त्यांनी नुकत्याच लिहिलेल्या एका पोस्टमध्ये सांगितला आहे. हा किस्सा आहे त्यांच्या दारूच्या व्यसनाचा. असं नेमकं काय घडलं, ज्यानंतर किरण माने यांनी दारू कायमची सोडली, ते यात वाचायला मिळतंय. गेल्या चौदा वर्षांपासून त्यांनी दारूला स्पर्शसुद्धा केला नाही.

किरण माने यांची पोस्ट-
‘त्या दिवसापास्नं दारू अशी सुटलीये की आता चितेवर जाईपर्यन्त एक थेंबही प्यायची इच्छा होणार नाय ! चौदा वर्ष उलटून गेली…लैच वाढलंवतं पिण्याचं प्रमाण ! अभिनयातलं करीयर अर्धवट सोडून व्यवसाय सुरू करायला लागला होता. घरची परिस्थिती फार चांगली नव्हती. पर्यायच नव्हता. आज सातार्‍यात माझ्यावर प्रेम करणारे असंख्य लोक आहेत.. पण त्यावेळीपासून सातार्‍यात आमच्या क्षेत्रातलं माझ्यावर खार खाऊन असलेलं – हितशत्रूंचं एक आठदहा जणांचं टोळकंय. ते लै खुश झालंवतं. “किरन्या लै उड्या मारत होता. बच्चन समजत होता स्वत:ला. बसला दुकानात आता.” एकमेकांना टाळ्या देत चर्चा सुरू झालीवती. माझ्यासमोर यायला घाबरणारी बेडकं, वाट वाकडी करून दुकानावर चक्कर मारत होती. मी वरवर माज दाखवत होतो, पण आतनं पार खचलोवतो. रात्री ‘गुलबहार’ नायतर ‘अवंती’ मध्ये जाऊन दोन पेग मारल्यावर डोकं थंड व्हायचं. दुकानामुळं पैसा यायला लागलावता. ती चिंता नव्हती आता.’
‘एकीकडे व्यवसायात स्थिर होत होतो, पण दूसरीकडं ‘अभिनय’ सोडायला लागलेल्याचं फ्रस्ट्रेशन टोकाला गेलं होतं. ती नोटांची बंडलं मला सुख देऊ शकत नव्हती, ना वाढलेला बँक बॅलन्स.. मला अभिनयातच करीयर करायचं होतं. जो काही त्रास होईल तो सहन करून अभिनय करायचा होता. पण… वाईट्ट अडकलो होतो. बेक्कार फसलो होतो. पुढे अंधार दिसत होता. पिण्याचं प्रमाण अशक्य वाढत गेलं. …अशातच एक दिवस सणक आली आणि दूबेजींच्या वर्कशॉपसाठी दुकान बंद केलं. वर्कशॉप झालं, पुढं काय? अंधाSSर. पुन्हा पिणं. दूबेजींकडून शिकलेले कानमंत्र-शब्द न शब्द-एका डायरीत लिहून ठेवलं. हळूहळू नाटकातले काही होतकरू नवोदित अभिनय शिकायला माझ्याकडे येऊ लागले. त्यांना माझं हे व्यसन लक्षात आलंवतं. पोरं स्वत:च्या खर्चानं मला महाबळेश्वर-कोकणात घेऊन जायची. मला हवा तो ब्रँड समोर ठेवायचा आणि मी त्यांचं अभिनयाचं वर्कशॉप घ्यायचो. अख्खा खंबा रिचवूनही दूबेजींवर तासनतास बोलत बसायचो. पोरांना शिव्या देत-प्रसंगी फटके देत बॉडी लँग्वेज-वाचिक अभिनय-एक्सप्रेशन्स-मेथडस् शिकवू लागलो.’
‘हळूहळू करीयरची गाडी मार्गावर येण्याची चिन्हं दिसू लागली, पण पिणं थांबेना. इतकी प्यायलोय – इत्तक्की प्यायलोय त्याकाळात… पण यामुळे सातार्‍यातल्या हितशत्रूंच्या ‘त्या’ टोळक्याला नविन विषय झाला… “किरण्या ॲक्टर चांगलाय पण लै पितो आणि शिव्या देतो.” त्यांना कुठूनतरी माझी ‘बदनामी’ हवी होती. मी आयतं खाद्य पुरवत होतो. खरंतर मी दारू पिऊन कधीही कुठलंही गैरकृत्य केलं नाही, पण माझ्याविषयी खोटे किस्से पसरवले जाऊ लागले.. मला टारगेट केलं गेलं. माझा ग्रुप फोडला.. खपून तयार केलेली पोरं सोडून गेली.. अर्थात यात माझीही चूक होती. एकटा पडलो. ज्यामुळे माझ्या मनाला यातना होऊ लागल्या. काहीही करुन माझ्या अभिनयाला झाकोळून टाकेल अशी कुठलीही गोष्ट मला करायची नव्हती.. खूप तडफडलो. दारू सोडावीशी वाटू लागली पण सुटणं अशक्य वाटत होतं. असं मानसिक द्वंद्व कधीच अनुभवलं नव्हतं. घुसमट-घुसमट झाली. चारभिंतीच्या डोंगरानं मध्यरात्रीच्या अंधारात माझे हंबरडे ऐकलेत.. माझ्या शेजारी प्रसन्न दाभोळकर नांवाचे मानसोपचार तज्ञ रहातात. मी त्यांचा सल्ला घेऊ लागलो. सावरू लागलो.’
‘चौदा वर्षांपूर्वीचं ३१ डिसेंबर.. २००९ साल. समोर ‘ग्लेनफिडीच’ स्काॅचची बाॅटल ! बायकोला सांगीतलं ‘ही शेवटची.’ बेगम अख्तरच्या ग़ज़ला लावल्या. पहिला पेग भरला.डायरी घेतली.. यापुढे दारू बंद..आणि काय काय करायचंय-कशावर फोकस करायचाय हे लिहीत बसलो..रात्रभर.. आणि मुक्त झालो ! आजतागायत..’

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles