नगर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये अनुदानाची घोषणा राज्य सरकारने केली आहे. या योजनेतील महिलांना जिल्हा सहकारी बँक नि:शुल्क बँक खाते उघडून देणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी दिली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांचे राज्य शासनाने दि. १ जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. यासाठी महिलेचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
बँक खातेअभावी महिलांचे नुकसान होवू नये व खाते उघडताना आर्थिक भुर्दंड पडू नये यासाठी जिल्हा बँकेने हा निर्णय घेतल्याचे बँकेचे उपाध्यक्ष अॅड. माधवराव कानवडे यांनी सांगितले.
जिल्हा बँकेच्या विस्तार कक्षासह एकूण २९८ शाखांचे जिल्ह्यात जाळे असून प्रामुख्याने ग्रामीण भागात बँक सर्व खातेदारांना सेवा देते. महिलांना जिल्हा बँक शाखेत ‘झीरो बॅलन्स’ (शून्य शिल्लक रक्कम) खाती बँकेच्या सर्व शाखांमध्ये तत्काळ खाते उघडून घेण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. खाते उघडण्यासाठी खाते उघडण्याचा अर्ज, दोन फोटो, आधारकार्ड झेरॉक्स इ. आवश्यक कागदपत्रांची केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे.