मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुती सरकारला बिनशर्त पाठिंबा दर्शवला. दरम्यान, पुन्हा एकदा राज ठाकरे शिंदेच्या शिवसेनेचे अध्यक्ष होतील अशी चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे यांनी नेहमीच “असं काही होणार नाही, मी माझा पक्ष सांभाळेन, मला माझी स्वतःची मुलं कडेवर घेऊन फिरायचं आहे”, अशा प्रकारची उत्तरं देत आहेत. मात्र राज यांच्याबद्दलची चर्चा थांबलेली नाही. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज ठाकरे यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. आंबेडकर यांनी काही वेळापूर्वी एबीपी माझाला मुलाखत दिली. यावेळी ते म्हणाले, “नजिकच्या काळात राज ठाकरे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख होऊ शकतात.” यावेळी आंबेडकर यांनी वेगवेगळ्या राजकीय प्रश्नांना उत्तरं दिली. आंबेडकर म्हणाले, “या लोकसभा निवडणुकीत आम्ही शिवशक्ती आणि भीमशक्तीचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला मात्र सध्याच्या टप्प्यात तो अपयशी झाला आहे.”