अहिल्यानगर : ” विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील काँग्रेसचे पदाधिकारी अत्यंत अस्वस्थ व निराश असुन येत्या काही दिवसांत ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील,” असा विश्वास भाजपा नेते श्री.विनायक देशमुख यांनी व्यक्त केला.
“मागील काही दिवसांत राज्याच्या विविध भागातून काँग्रेसच्या अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी आपणाशी संपर्क केला असुन भाजपात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत आपण लवकरच मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे, ना. राधाकृष्ण विखे पा. यांच्याशी चर्चा करणार असुन माजी मुख्यमंत्री व खा.अशोकराव चव्हाण हे नुकतेच शिर्डी येथे आले असताना आपण यासंदर्भात प्राथमिक चर्चा केली असल्याचे श्री.देशमुख यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती देताना श्री. देशमुख म्हणाले , “काँग्रेसच्या प्रदेश स्तरांवरील नेतृत्वाच्या कार्यपध्दती बाबत कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे. यापुर्वीही अनेक नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे राजीनामे दिले आहेत. आता केंद्रात व राज्यात पुढील पाच वर्षे कॉन्ग्रेस पक्ष सत्तेत नाही. किमान विरोधी पक्षनेते पद देखील कॉन्ग्रेस पक्ष स्वतः कडे राखुन शकला नाही. वारंवार अपयश येऊन देखील पक्षश्रेष्ठी त्याच त्याच नेतृत्वाकडे पुन्हा पुन्हा सुत्र देत आहेत. त्यामुळे जिल्हा व राज्य स्तरावरील पदाधिकाऱ्यांना भवितव्याबाबत चिंता वाटु लागली आहे. त्यामुळे आगामी काळात अनेक जिल्ह्यातील आजी माजी पदाधिकारी, माजी आमदार भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील, असा विश्वास श्री.देशमुख यांनी व्यक्त केला आहे.