श्रीरामपूर : साखर खरेदीबाबत करारात ठरल्याप्रमाणे पैसे देवूनही त्याबदल्यात साखर न देता फसवणूक करून कराराचा भंग केला, तसेच करारात ठरल्याप्रमाणे एक कोटी २४ लाख ७७ हजार ३९० रुपये परत न करता आर्थिक फसवणूक केली.याप्रकरणी साजन शुगर प्रा. लि. चे अध्यक्ष साजन सदाशिव पाचपुते व संचालक मंडळाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी राजेश रुपचंद कासलीवाल (व्यवसाय साखर व तेलाचे व्यापारी, रा. हिराभवन, श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, साजन सदाशिव पाचपुते (रा. काष्टी, ता. श्रीगोंदा) अध्यक्ष साजन शुगर प्रा. लि. व तेथील संचालक मंडळाने साखर खरेदीबाबतचा ८ जुलै २०२२ रोजी सविस्तर करारनामा केला होता. करारात ठरल्याप्रमाणे साखरेचे ९३ लाख रुपये घेतले. त्याबदल्यात साखर न देता माझी फसवणूक करून कराराचा भंग केला.
त्यांच्याकडे पैसे परत मागण्यास गेलो असता पाचपुते यांनी सन २०२३ मध्ये भीमालयनगर (पुणे) येथे त्यांच्या नावे असलेला ३५ वर्षे जुना वन बीएचके फ्लॅट ३४ लाख, ६२ हजार रुपये किमत ग्राह्य धरून माझ्या नावाने करून दिला. उर्वरित रक्कम ५८ लाख ३८ रूपये मुद्दल व कराराचा भंग केला म्हणून करारात ठरल्याप्रमाणे एकूण रक्कम ६६ लाख ३९ हजार ३९० रुपये अशी एकूण एक कोटी २४ लाख ७७ हजार ३९० रुपये मला परत न करता स्वत:च्या फायद्याकरिता सदरची रक्कम वापरली, तसेच माझे आर्थिक नुकसान करून फसवणूक केली.याप्रकरणी कासलीवाल शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्य़ादीवरून साजन शुगर प्रा. लि.चे अध्यक्ष साजन पाचपुते व संचालक मंडळ यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.