नाशिक : आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याचा दावा करून कृषी अधिकारी असलेली महिला व तिचा मुलगा स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्राच्या विश्वस्ताकडून दहा लाख रुपयांची खंडणी घेत असताना पोलिसांनी मायलेकाला रंगेहाथ अटक केली होती. या प्रकरणी संशयित महिला आणि तिच्या मुलाविरुद्ध नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेने व तिच्या मुलाने वीस कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करत एक कोटीची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणाच्या तपासाला पोलिसांनी गती दिली असून संशयित महिलेच्या घरातून पोलिसांनी १९ लाख रूपयांची रोकड जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. महिलेच्या मोबाइल डेटाचेही तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आले असून आक्षेपार्ह व्हिडिओ फॉरेन्सिकच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्राच्या विश्वस्त मंडळातील कार्यकारी सदस्य निंबा मोतीराम शिरसाट (५४) यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याचे सांगून वेळोवेळी ‘ब्लॅकमेल’ करून सुमारे १ कोटी रुपयांची खंडणी संशयित मायलेकांनी उकळल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी संशयित महिला कृषी सहायक सारिका बापूराव सोनवणे (४२), तिचा मुलगा मोहित बापूराव सोनवणे (२५) या दोघांना अटक केली आहे. येत्या बुधवारपर्यंत (दि.२२) जिल्हा व सत्र न्यायालयाने या मायलेकाला पोलीस कोठडी सुनावली आहे.दिंडोरी येथील स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्राच्या नाशिक येथील गंगापूर रोड वर असलेला केंद्रामध्ये विश्वस्त म्हणून कार्यरत असलेले निंबा मोतीराम शिरसाट यांची २०१४ पासून याच केंद्रामध्ये केंद्र व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या सारिका बाबुराव सोनवणे या कृषी अधिकारी पदावर काम करणाऱ्या महिलेशी ओळख झाली. या महिलेचे पती बापुराव सोनवणे यांचे २०१९ मध्ये निधन झालेले आहे. सारिका बापुराव सोनवणे या आपल्या मुलासह या केंद्राच्या जवळच असणाऱ्या सोसायटीमध्ये राहतात.
त्यांनी सातत्याने निंबा मोतीराम शिरसाट यांच्याशी असलेला ओळखीचा फायदा घेऊन प्रथमदर्शनी हात उसने पैसे मागितले. त्यानंतर माझ्याकडे आक्षेपार्ह व्हिडिओ आहे, अशी धमकी देऊन सातत्याने सारिका बापूराव सोनवणे यांनी आपल्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संकल्प सिद्धी नावाची कंपनी पैसे डबल करून देते असे आमिष दाखवून पैसे उकळायला सुरुवात केली.
त्यानंतर जानेवारी २०२३ पासून सोनवणे यांनी निंबा शिरसाठ यांच्याकडे व्हिडिओचे कारण सांगून सातत्याने खंडणी मागितली. आतापर्यंत शिरसाठ यांनी सारिका सोनवणे यांना सुमारे एक कोटी पाच लाख रुपये इतकी खंडणी दिली असून या प्रकरणाला सातत्याने वैतागून शिरसाठ यांनी गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये या दोघा मायलेका विरोधात तक्रार दाखल केली.