पाथर्डी -शहरातील नाथनगर येथील जय बजरंग तरुण मंडळ व वामनभाऊ नगर येथील शिवशंभू तरुण मंडळाची विसर्जन मिरवणूक नाईक चौकात समोरासमोर आल्यानंतर मिरवणुकीतील डीजेंमध्ये आवाजावरून स्पर्धा सुरू झाल्याने एक तरुण डीजेच्या साऊंडवरून पडून गंभीर जखमी झाला.
नागरिकांच्या तक्रारीनंतर डीजेच्या दणदणाटाच्या आवाजाच्या प्रचंड गोंधळानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करून जमाव पांगवला. पोलिसांनी मात्र या प्रकरणी कोणतीच कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
शुक्रवारी (दि. १३) रात्री नऊच्या सुमारास शहरातील नाईक चौकात दोन डीजेंची कोणाचा आवाज जास्त अशी जीवघेणी आवाजाची स्पर्धा सुरू झाली. प्रचंड मोठा आवाज, लेझर लाइटची किरणे, डीजेच्या दणादणाटाने परिसरातील असलेल्या दुकानांतील काचेच्या वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
याबाबत अनेक नागरिकांनी पोलिसांना माहिती देऊन शहरात डीजेचा दणदणाट सुरू असून, कर्कश्श आवाज डीजेवरून सोडला आहे. या आवाजाच्या गोंगाटामध्ये जय बजरंग मंडळाच्या डीजेच्या साऊंडवर उभा राहून नाचणारा आलिम दिलावर शेख (रा. नाथनगर) हा युवक सुमारे बारा फुटांवरून खाली पडून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. नागरिकांच्या तक्रारीनंतर सुमारे ३० ते ४० पोलिसांनी रस्त्यावर उतरून लाठीचार्ज करत जमाव पांगविला. मात्र, डीजेसाठी वापरण्यात आलेले ट्रॅक्टर, साऊंड पोलिसांनी ताब्यात घेतले नसल्याबाबत पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे. याबाबत कोणी तक्रार दाखल केली नसून गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे डीजे जप्त केला नाही, असे या वेळी पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे म्हणाले.