Thursday, March 27, 2025

अवघी २५ टक्केच वसुली झाल्याने थकबाकीदारांवर जप्ती कारवाईचे महानगरपालिका आयुक्तांचे आदेश

शास्तीमाफी देऊनही वसुलीला अपेक्षित प्रतिसाद मिळेना; २०४ कोटींचा कर थकीत

सवलत देऊनही अवघे १३ कोटीच वसूल; स्वहिस्सा भरण्यासाठी निधी नाही

अहिल्यानगर – मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या वसुलीसाठी वारंवार सवलत देऊनही थकबाकीदार कर भरण्यास टाळाटाळ करत आहेत. परिणामी, थकबाकी २०४ कोटींवर पोहोचली आहे. शास्तीमध्ये १०० टक्के सवलत देऊनही अवघे १३ कोटीच वसूल झाल्याने महानगरपालिकेच्या आर्थिक अडचणी वाढत आहे. वीजबिले, अत्यावश्यक खर्चाची देयके मोठ्या प्रमाणात थकीत आहेत. वसुली होत नसल्याने विविध योजनांमध्ये स्वहिस्सा भरण्यासाठी महानगरपालिकेत निधी उपलब्ध नाही. अवघी २५ टक्केच वसुली झालेली असल्याने आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी थकबाकीदारांवर जप्ती कारवाई तीव्र करण्याचे आदेश प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत.

महानगरपालिकेच्या कराची थकबाकी २१५ कोटींवर पोहोचल्याने मागील महिन्यात आयुक्त यशवंत डांगे यांनी १०० टक्के शास्ती माफ केली. त्याला मुदतवाढही दिली. तरीही फक्त १३ कोटींचीच वसुली झाली आहे. पाणी पुरवठ्याची वीजबिले, जलसंपदा विभागाची थकीत देणी, इतर अत्यावश्यक सेवांची देणी थकली आहेत. आजमितीला महानगरपालिकेला ४९६ कोटी रुपयांची देणी आहेत. सद्यस्थितीत २०४ कोटी थकीत असल्याने आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. विविध देणी देण्याबरोबरच शासकीय योजनांचा स्वहिस्सा भरण्यासाठी महानगरपालिकेत निधी उपलब्ध नाही.

राज्य सरकारने महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेतून रस्त्यांसाठी १५० कोटींचा निधी दिला आहे. यात ४५ कोटी रुपयांचा स्वहिस्सा आहे. त्यापैकी सुमारे १० कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. उर्वरित ३५ कोटी जमा करावे लागणार आहेत. जिल्हास्तर नगरोत्थान योजनेत १९ कोटींचा स्वहिस्सा भरणे बाकी आहे. सोलर प्रकल्प व नाट्य संकुल २ कोटी, फेज टू ५ कोटी तर, अमृत भुयारी गटार योजनेत ३७ कोटींचा स्वहिस्सा भरणे बाकी आहे. वसुली वाढत नसल्याने स्वहिस्सा भरण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. यातून कामे रखडण्याची शक्यता आहे. त्यामुळे थकबाकीदारांवर जप्ती कारवाई अधिक तीव्र करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांनी सवलतीचा लाभ घेऊन तत्काळ थकीत कराचा भरणा करावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles