आयुक्त साहेब, पे अँड पार्किंग वरून एखाद्याचा खून पडण्याची आपण वाट पाहत आहात काय ?, योजना मागे घ्या, अन्यथा जनआंदोलन उभे करू : किरण काळे
नागरिक आणि वसुलीधारकांमध्ये जोरदार वाद, पैसे न देता नागरिकांची असहकाराची भूमिका
प्रतिनिधी : शुक्रवारी सकाळची वेळ. सकाळीच नागरिकांमध्ये आणि मनपाचे कर्मचारी असल्याचे म्हणत पे अँड पार्किंगची रक्कम वसुली करणाऱ्यांमध्ये चांगलाच वाद पेटला. गाड्या पार्क करायच्या असतील तर पैसे द्या. नाहीतर तुमच्या गाड्या इथून हलवा. इथे गाड्या लावायच्या नाहीत, असे मनपाचे असल्याचे सांगत काही महिला नागरिकांना म्हणू लागल्या. हा वाद काही वेळाने चांगलाच हमरी तुमरीवर आला. नागरिकांनी या वसुलीला जोरदार विरोध करत चांगलेच धारेवर धरले. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी या वादाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर स्वतःच्या फेसबुक हँडल वरून व्हायरल केला आहे. काळे यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून म्हटले आहे की, आयुक्त साहेब, पार्किंगच्या अशा वादांमधून एखाद्याचा खून पडण्याची आता तुम्ही वाट पाहत आहात काय, असा जाहीर सवाल केला आहे.
झाले असे की, शुक्रवारी सकाळी आनंदऋषीजी हॉस्पिटलला लागून असणाऱ्या रस्त्यालगतच्या बिल्डिंगमध्ये एका खाजगी कम्प्युटर इन्स्टिट्यूट मध्ये जेईईची परीक्षा होती. त्यासाठी विद्यार्थी, पालक चार चाकी, दुचाकी वरून मोठ्या संख्येने आले होते. मात्र आपली वाहने पार्क करत असताना अचानक काही महिला येऊन नागरिकांना म्हणाल्या की, आम्ही मनपाचे लोक आहोत. इथे वाहन पार्क करायचे असतील तर दुचाकीसाठी पाच रुपये, तर चार चाकी साठी दहा रुपयांच्या पावत्या फाडाव्या लागतील. यावरून चांगल्याच वादाला तोंड फुटलं. बराच वेळ हा वाद सुरू होता. यावेळी नागरिकांनी संबंधितांना चांगलेच धारेवर धरत जाब विचारला.
इन्स्टिट्यूट चालक पालकांमध्ये तू तू मै मै :
यावेळी पालकांनी ज्या इन्स्टिट्यूट मध्ये परीक्षा होती त्यांनाच जाब विचारायला सुरुवात केली. तुमच्या बिल्डिंगचे पार्किंग कुठे आहे ? तुम्ही येणाऱ्यांची पार्किंगची काय सोय केली आहे ? यावेळी तथाकथित मनपा ठेकेदाराचे वसुली कर्मचारी देखील समोर उपस्थित होते. इन्स्टिट्यूट चालक आणि पालकां मधील या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे शहरभर हा चर्चेचा विषय झाला आहे.
विरोध करणाऱ्या नागरिकांचे काँग्रेस कडून कौतुक :
किरण काळे म्हणाले की, शहरवासीयांची नाहक लूट करणाऱ्या या तथाकथित योजनेची घोषणा होता क्षणीच काँग्रेसने लेखी निवेदन देत या योजनेला कडाडून विरोध केला आहे. आम्ही नागरिकांना देखील याबाबतीत असहकाराची भूमिका घेण्याचे आवाहन केले होते. नागरिकांनी देखील याला प्रतिसाद देत चौका चौकात अशाच पद्धतीने या योजनेला विरोध करत असहकारची भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. लूट करणाऱ्या या योजनेला विरोध करणाऱ्या धाडसी जागरूक नगर नागरिकांच काँग्रेस कौतुक करत असल्याचं काळे यांनी म्हटल आहे.
फलक, मार्किंग नाही, तशीच बेकायदेशीर वसुली :
किरण काळे यांनी गंभीर मुद्द्यावर बोट ठेवले आहे. हा वादाचा प्रसंग घडला त्या रस्त्यावर पे अँड पार्कचे वसुलीचे कोणतेही फलक लावण्यात आलेले नाहीत. तसेच पार्किंगसाठीचे रस्त्याच्या कडेला कोणतेही मार्किंग करण्यात आलेले नाही. शहरामध्ये अनेक ठिकाणी हीच अवस्था आहे. त्यामुळे संबंधित कर्मचारी हे मनपाचे अधिकृत ठेकेदाराचेच आहेत की नाही ही देखील शंकास्पद बाब आहे. विशेष म्हणजे प्रत्येक ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून त्यांना पुढे केले जाते. यामुळे नागरिकांना आपण काही बोललो तर आपल्यावर खोटे गुन्हे संबंधित महिलांकडून दाखल केले जातील अशी खाजगी मध्ये कुजबूज आहे. म्हणून नागरिक त्यांच्याशी बोलण्याचे देखील टाळण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे फलक, मार्किंग न करता सुरू असणारी ही वसुली बेकायदेशीर वसुली असल्याचा आरोप किरण काळे यांनी केला आहे.
त्यांच्या पंटर लोकांच्या तुंबड्या भरण्यासाठी हा खटाटोप :
शहरामध्ये लाख दुचाकी, चार चाकी वाहनांची एकत्रित संख्या सुमारे साडेतीन लाख एवढी आहे. यापैकी पन्नास टक्के जरी गाड्या रस्त्यावर शहरात दररोज उतरत असल्या तरी ही संख्या सुमारे दीड ते पावणे दोन लाख वाहनांची आहे. तसेच शहर बाहेरील नागरिक देखील वाहनाने कामानिमित्त शहरात दिवसभरामध्ये येत असतात. ती संख्या सुद्धा हजारो वाहनांची आहे. एक नागरिक सकाळी घरातून बाहेर पडल्यापासून ते संध्याकाळी घरी परत येईपर्यंत आपल्या वेगवेगळ्या कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी जात असताना आपली गाडी पार्क करत असतो. त्यामुळे दिवसातून अनेक ठिकाणी गाडी पार्क करण्याची गरज भासत असल्यामुळे शहराच्या बहुतांशी रस्त्यांवर अशा पद्धतीने वसुली सुरू असल्यामुळे त्याला अनेक वेळा वसुलीच्या या प्रसंगाला सामोरे जावे लागते. धक्कादायक गोष्ट म्हणजे ही आकडेवारी एवढी मोठी असताना दुसरीकडे मनपाने अवघ्या १२०९ रुपये प्रतिदिन या दराने हा ठेका दिला आहे. काही लाख गाड्यांचे पाच आणि दहा रुपयांनी जरी वसुलीचे गणित पाहिले तरी सुमारे सहा ते नऊ लाख रुपयांची प्रतिदिन वसुली एका बाजूला करण्याचा घाट दिसत असून कवडीमोल रेवड्या कवड्या मनपा कागदावर घेत असून अंधारात मात्र अनेकांनी याचा मलिदा वाटून घ्यायचा डाव आखला आहे. यात मोठी हप्तेखोरी सुरू आहे. शहरातील सत्ताधारी नेतृत्वाच्या आशीर्वादाने आपल्या पंटर लोकांच्या तुंबड्या भरण्यासाठी हा खटाटोप सुरू असल्याचा गंभीर आरोप किरण काळे यांनी केला आहे.
योजना मागे घ्या, अन्यथा जन आंदोलन उभे करू :
ही अन्यायकारक योजना तात्काळ मागे घ्या. नगरकरांना पिण्याचे पाणी, रस्ता, आरोग्य, स्ट्रीट लाईट, सांडपाणी व्यवस्थापन यासारख्या अत्यंत मूलभूत स्वरूपाच्या असणाऱ्या सुविधा सुद्धा मनपा नीटनेटक्या पद्धतीने पुरवू शकत नाही. मात्र दुसऱ्या बाजूला सुधारित कर रचना, पाणीपट्टी मध्ये वाढ, पार्किंगसाठी लूट करणारी वाढ या माध्यमातून नगरकरांना वेठीस धरत त्यांचे जगणे मेटाकुटीला आणत आहे. पाणीपट्टीची वाढ जाहीर झाल्यानंतर त्याला विरोध करण्यासाठी शहराचे आमदार पुढे आले. स्वतःचे सरकार आणि स्वतःच आणलेला प्रशासक असताना एकीकडे करात वाढ करायची. दुसरीकडे त्याला विरोध करत असल्याचे दाखवायचे. ही नौटंकी नगरकरांना समजते हे त्यांनी विसरू नये. मात्र पें अँड पार्कला त्यांचा पाठिंबा असून त्यांच्याच बगलबच्चांना याचा ठेका चालवायला दिला गेला आहे. हे प्रशासनाने व सत्ताधाऱ्यांनी तात्काळ थांबवावे. अन्यथा नागरिकांच्या प्रत्यक्ष सहभागातून या योजनेला विरोध करणारे मोठे जन आंदोलन काँग्रेसच्या वतीने उभे करण्याचा इशारा, किरण काळे यांनी दिला आहे.