जिल्ह्यातील ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते, पूर्व पदाधिकारी, वृद्ध कारसेवक यांचे स्मरण ठेवा- प्रा-मधुसूदन मुळे
नगर – प्रदेश अधिवेशन शिर्डी येथे होत आहे, याचा निष्ठावंत कार्यकर्त्यांना आनंद होत आहे. गेली पन्नास-साठ वर्षे ज्यांनी ध्येयाने प्रेरीत होऊन कार्य केले व ज्या काळात पार्टीला जनाधार नव्हता, त्या काळात राष्ट्रहिताचा भारतीय संस्कृतीचा पार्टीचा विचार सामान्य जनतेपर्यंत पोहचविव्याचा प्रयत्न केला. ते कार्यकर्ते आजही जिह्यात कार्यरत आहेत.
पक्षाकडे निधीची चणचण असायची. घरचे डबे बरोबर घेऊन पक्ष कार्यकरिता ते प्रवास करीत सर्व संकटांचा हालअपेष्टांचा मुकाबला करीत कार्य करीत होते. पोलीसांचा त्रास, लाठीमार, तुरुंगवास सहन करीत होते.
श्रद्धेय अटलजी, अडवाणीजी, जगन्नाधराव जोशी प्रमोदजी महाजन, गोपीनाथजी मुंडे, सूर्यभानजी वहाडणे अशा महान नेतृत्वाच्या, मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे समवेत अनेक आंदोलनांमध्ये सहभागी झालेले कार्यकर्ते या जिल्ह्यात आहेत. ध्येय स्पष्ट होते आसेतु हिमाचल एक सशक्त राष्ट्र उभे करायचे होते. सांस्कृतिक राष्ट्रवाद, एकात्म मानववाद, राष्ट्रीय अखंडता आणि समाजप्रबोधन ही मूलतत्वे साकार करायची होती.
आज राज्यात आणि देशात भाजपाची सत्ता आहे. अशा सत्ताधारी पक्षाचे हे अधिवेशन होणार आहे. एक विशाल भव्यदिव्य अधिवेशन साकारले जाणार आहे. ते रूप ज्येष्ठ निष्ठावंतांना, वृद्ध कारसेवकांना, पूर्व पदाधिकार्यांना डोळे भरून पाहता यावे, आनंद घेता यावा, यासाठी त्यांना निमंत्रीत करण्यात यावे. त्यांची स्वतंत्र आसन व्यवस्था असावी, असे स्पष्ट मत प्रा. मधुसूदन मुळे यांनी व्यक्त केले असून तसे पत्र प्रदेश कार्यालयाला पाठवले आहे.






