नगर : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जिल्हा व महानगरपालिका स्तरावर महत्वाच्या आरोग्य निर्देशांकानुसार मासिक रँकिंग दिले जाते. हे रँकिंग म्हणजे स्पर्धा नसून सदर निर्देशांकानुसार आरोग्य सेवांच्या अद्ययावत परिस्थितीचे महापालिकांना आकलन व्हावे यासाठी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना रँकिंग दिले जाते. रँकिंगनुसार कामातील त्रुटी दूर करून आरोग्य सेवांमध्ये सुधारणा व्हावी हा उद्देश असतो. ही सर्व प्रक्रिया थेट शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग स्तरावर होते. यात रॅंकिग घसरल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी असे कुठेही नमूद नाही. तरीही या प्रकरणी शासकीय पत्रकाचा चुकीचा अर्थ लावून माझ्यावर केलेली सक्तीच्या रजेवर जाण्याची कारवाई मागे घेऊन शासनाने मला अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये कलम ४५ (४) अन्वये दिलेल्या नेमणूकीनुसार माझे कामकाज करण्यास तात्काळ परवानगी द्यावी, असे पत्र वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांनी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना दिले आहे.या पत्राच्या प्रती नगरविकास खात्याचे प्रधान सचिव, आरोग्य सेवा संचालक तसेच राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाचे अतिरिक्त संचालक यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.
डॉ.अनिल बोरगे यांनी पत्रात नमूद केले आहे की, रॅंकिंग बाबत प्राप्त झालेल्या पत्रांचा चुकीचा अर्थ काढून मला सक्तीच्या रजेवर पाठविलेले आहे. या संदर्भात मी आपणास पत्र देवून सक्तीचा रजेचा आदेश मागे घेणे बाबत विनंती केलेली आहे. सदर पत्रामध्ये नमूद केल्यानुसार मी दिनांक ८ जानेवारी २०२५ रोजी पुणे येथे संचालक, राज्य कुटूंब कल्याण कार्यालयात उपस्थित होतो. तेथे संबंधित अधिकारी यांना मी झाल्या प्रकाराबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे व अहिल्यानगर महानगरपालिकेचे वैद्यकिय आरोग्य अधिकारी यांचे रॅंकिंग झालेल्या कामाच्या अनुषंगाने चुकीचे असल्याबाबत निदर्शनास आणून दिलेले आहे. त्या संदर्भात सदरचे कामकाज पाहणारे अहिल्यानगर महानगरपालिकेचे कै.बाळासाहेब देशपांडे दवाखाना येथील वैद्यकिय अधिकारी, नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी, नर्सेस यांना वेळोवेळी दिलेल्या सुचना, ज्ञापन व त्यांचे खुलासे या संदर्भात सुध्दा चर्चा झालेली आहे. त्यानुसार निश्चितपणे त्याची नोंद घेवुन अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वैद्यकिय आरोग्य अधिकारी यांचे रॅंकिंग सुधारणार आहे.
तथापि राज्य कुटूंब कल्याण कार्यालयाने जिल्हा व महानगरपालिका स्तरावरील आरोग्य निर्देशांकानुसार मासिक रॅंकिंग सुरू होण्यामागे संदर्भ क्रमांक ३ चे पत्र आपले निदर्शनास आणून देण्याकरीता व सक्तीच्या रजेची कार्यवाही चुकीचा अर्थ काढून झाल्याबाबत अवगत करण्याकरीता दिलेले आहे. सदरचे पत्र हे सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व जिल्हा शल्य चिकित्सक, सर्व वैद्यकिय आरोग्य अधिकारी यांच्याकरीता असुन त्याच्या प्रती संचालक, आरोग्यसेवा, अतिरिक्त संचालक यांच्याकरीता आहे. सदरच्या पत्रामध्ये राज्यामध्ये जिल्हा स्तरावर जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी व महानगरपालिका स्तरावर वैद्यकिय आरोग्य अधिकारी यांच्या अधिनस्त आरोग्य संस्थाकडून आरोग्य सेवा दिल्या जातात. सदरील आरोग्य सेवांचा आढावा घेण्यासाठी/ माहिती मिळण्यासाठी निर्देशांक निश्चित करण्यात आले आहेत. या निर्देशांकानुसार आरोग्य सेवांचे महानगरपालिकांना आकलन व्हावे, यासाठी राज्यातील सर्व जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि वैद्यकिय आरोग्य अधिकारी यांचे दरमहा रॅंकिंग करण्याचा ऑगस्ट २०२२ मध्ये निर्णय घेण्यात आला आहे.” असे नमूद करण्यात आलेले आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकिय आरोग्य अधिकारी यांचेवर सदरच्या रॅंकिगच्या क्रमानुसार त्यांच्यावर सक्तीची रजा लादणे, अथवा शिस्तभंग विषयक कारवाई करणे याचा प्रश्न उद्भवत नाही. तसेच सदरच्या पत्रामध्ये कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. क्षेत्रिय स्तरावर कामे करणारे नर्सेस, वैद्यकिय अधिकारी, आशा सेविका, डाटा एंट्री ऑपरेटर यांना या संदर्भात शासनाकडून लॉग ईन आयडी व पासवर्ड उपलब्ध करून दिलेले आहेत. तसेच पत्रामध्ये सदरची कार्यवाही ही महानगरपालिकांच्या आरोग्य सेवेमध्ये सुधारणा व्हावी, क्षेत्रिय अधिका-यांना कामातील त्रूटी समजाव्यात आणि त्यानुसार सुधारणा करण्यासाठी योग्य नियोजन करता येईल, असे उद्दीष्ट ठेवुन करण्यात येत आहे, असे नमुद केलेले आहे.
सदरच्या रॅंकिंगचा मूळ उद्देश लक्षात न घेता चुकीचा अर्थ काढून माझ्यावर सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश निर्गमित झालेले आहेत. तरी विनंती करण्यात येते की माझ्यावर चुकीच्या पध्दतीने सक्तीच्या रजेवर जाण्याचा झालेला आदेश मागे घ्यावा, असे डॉ. बोरगे यांनी पत्रात म्हटले आहे.