अहिल्यानगर-लव्ह मॅरेज केल्यानंतर सासरी नांदायला गेलेल्या युवतीचा छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुळची राहुरी व सध्या सावेडी उपनगरात राहत असलेल्या पीडिताने या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडिताच्या फिर्यादीवरून पती अतिष राजेश खोडे, सास निता राजेश खोडे, दीर सिध्दार्थ राजेश खोडे, ननंद निकिता राजेश खोडे, मामी सासू अलका संजय सनोरकर, मामा सासरे संजय कन्हैय्या सनोरकर, प्रितम संजय सनोरकर, विशाल संजय सनोरकर, वैष्णवी संजय सनोरकर (सर्व रा. तनपुरेवाडी रस्ता, राहुरी बुद्रुक, ता. राहुरी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीने अतिष खोडे सोबत लव्ह मॅरेज केले होते. त्यानंतर फिर्यादी अतिष सोबत सासरी राहुरी येथे नांदायला गेली असता तिचा 13 मार्च 2024 पर्यंत छळ करण्यात आला. पतीसह नऊ जणांनी तिला वेळोवेळी शिवीगाळ, लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून उपाशीपोटी ठेवले. घर बांधण्याकरीता व कामधंद्यासाठी 25 लाख रूपये घेऊन येण्याची मागणी वेळोवेळी केली. तसेच आई-वडिलांना व भावाला मारून टाकण्याची धमकी दिली.
दरम्यान, यानंतर पीडिताने येथील भरोसा सेलकडे तक्रार दाखल केली होती. तेथे समेट न झाल्याने त्यांनी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पत्र दिले. त्यानंतर मंगळवारी (10 डिसेंबर) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.