अहिल्यानगर-पैशाच्या वादातून दोन मित्रांवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास जेऊर बायजाबाई (ता. नगर) शिवारातील सबस्टेशन चौक येथे घडली. प्रशांत राधाकिसन आवारे व शुभम जरे (रा. इमामपुर, जेऊर, ता. नगर) अशी हल्ल्यात जखमी झालेल्या मित्रांची नावे आहेत.त्यांच्यावर अहिल्यानगर मधील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी प्रशांत आवारे यांनी उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका जणाविरूध्द रविवारी खुनाचा प्रयत्न व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक संपत जरे (रा. इमामपूर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. प्रशांत आवारे आणि त्यांचे मित्र शुभम जरे शुक्रवारी रात्री जेऊर सबस्टेशन चौकात होते. त्यावेळी अशोक तेथे आला आणि उधारीच्या पैशाच्या वादातून त्यांच्याशी वाद घालू लागला.
वाद विकोपाला गेल्यानंतर अशोकने धारदार कट्यारसारख्या चाकूने शुभम यांच्या डाव्या हातावर वार केला तसेच प्रशांत यांच्या मानेवर वार करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या प्रशांत व शुभम यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोंढे करत आहेत.