अहिल्यानगर : रस्त्याच्या बाजूला चारचाकीत झोपलेल्या व्यापाऱ्याला कोयत्याचा धाक दाखवून लुटल्याची घटना बुधवारी (दि. ३) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास नगर-पुणे रोडवरील कन्हैया हॉटेलसमोर घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रितेश सुरेश पटवा (रा. साईनाथनगर, ता. पाथर्डी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
बुधवारी पहाटे फिर्यादी, त्यांची आई व पत्नी असे तिघे पुणे येथून चारचाकीने पाथर्डीला जात होते. रितेश यांना झोप येऊ लागल्याने त्यांनी केडगाव बायपासपासून जवळच असलेल्या कन्हैया हॉटेलसमोर चारचाकी थांबविली. रस्त्याच्या बाजूला चारचाकी उभी करून ते सर्व चारचाकीतच झोपले. त्यावेळी तिथे तीन अनोळखी व्यक्ती आल्या. त्यांनी कारवर बॅटरी चमकविली. काचेवर उजेड पडल्याने रितेश यांना जाग आली. कुणी तरी पत्ता विचारत असावेत, असे रितेश यांना वाटले. म्हणून ते कारमधून खाली उतरले असता चोरट्यांनी रितेश यांच्या आईच्या गळ्यातील पावणेसात तोळ्याचे सोन्याचे मिनीगंठण हिसकावले. त्यातील एकाने फिर्यादीच्या पत्नीला कोयत्याच्या दांडक्याने मारहाण केली. त्यामुळे त्या ओरडल्याने चोरटे दुचाकीवरून निघून गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे.