अहिल्यानगर -लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीला पळवून नेणार्या शेवगावातील दोघांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. अल्पवयीन मुलीला तिच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. शेवगाव पोलीस ठाण्यात मुलीच्या वडिलांनी याबाबत फिर्याद दिली. याप्रकरणी अजिंक्य संजय खैरे, ऋषीकेश दत्तात्रय थावरे (दोघे रा. शेवगाव) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबतची माहिती अशी, शेवगाव येथील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला 4 जानेवारीला दोघांनी पळवून नेले. याबाबत मुलीच्या वडिलांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी दोन पोलीस पथके तयार करून एक पथक पाथर्डीत तर दुसरे पथक शिरुर (जि. बीड) येथे रवाना केले.
आरोपीचा शोध घेत असताना तांत्रिक तपासाच्या सहाय्याने मिळालेल्या माहितीनुसार तपास पथकाने पाथर्डी तालुक्यातील धायतडकवाडी गावाच्या शिवारात पीडित मुलगी व आरोपींना दुचाकीसह ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रविण महाले, पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत कुसारे, आकाश चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल शाम गुंजाळ, संतोष वाघ, बप्पासाहेब धाकतोडे, प्रशांत आंधळे, राहुल खेडकर, संपत खेडकर, राहुल आठरे, एकनाथ गरकळ, नगर दक्षिण सायबर सेलचे राहुल गुंडु यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण महाले करत आहेत.






