गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध लागल्यानंतर त्याला पकडण्यासाठी पाठलाग करणारा पोलीस कर्मचारी व सदर आरोपी विहिरीत पडल्याची घटना शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सांगवी (ता.संगमनेर) परिसरात घडली. पोलीस कर्मचार्याने आरडाओरड केल्यानंतर इतर कर्मचार्यांनी या पोलिसाला विहिरीतून बाहेर काढले. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, की 2016 मध्ये जुन्या वादातून हाणामारी झाल्याची घटना घडली होती. या घटनेतील आरोपी प्रशांत उर्फ संपत शांताराम गागरे याने सख्खा मामा आणि मामीला जमिनीच्या वादातून बेदम मारहाण केली. त्याच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल असून तो फरार झाला होता. काही दिवस शनिशिंगणापूर व पुणे येथे राहिला. अधूनमधून संगमनेरमध्ये येत असत. पोलीस त्याच्या मागावर असताना शुक्रवारी आरोपीचे स्थळ संगमनेर असल्याचे समजले. त्यानंतर तो नवीन नगर रोड परिसरात असल्याचे लक्षात आले.
पोलिसांनी तेथे जाऊन पाहणी केली. पथकातील दोन-दोन पोलीस प्रत्येक घरासमोर गेले. तेथे एका महिलेला विचारले असता पोलिसांचा आवाज आरोपी प्रशांत गागरे याच्या लक्षात आला. आपल्याला पकडण्यासाठी पोलीस घराबाहेर आलेले आहे हे लक्षात आल्यानंतर पोलिसाला धक्का देऊन त्याने पलायन केले. पोलीस पथकाने त्याचा पाठलाग केला. तो अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. पथकातील सर्व कर्मचारी आरोपीच्या मागे गेले. सांगवी गावामध्ये एका घासाच्या शेतातून आरोपी पळत होता. त्याचा पाठलाग पोलीस नाईक सचिन उगले हे करत होते. हा सर्व रात्रीचा थरार सुरू होता. आरोपी गागरेला पोलीस नाईक उगले पकडणार तेच शेतालगत असणार्या झाडाझुडूपांमधून आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. दोघांनाही विहिरीचा अंदाज आला नसल्याने ते विहीरीत पडले. आरोपी गागरेला पाण्यात पोहता येत होते. मात्र, पोलीस नाईक उगले यांना पोहता येत नव्हते.
आरोपी विहिरीतील वायररोपचा आधार घेऊन कडेला जाऊन शांत बसला होता. कुठलाही आवाज बाहेर येणार नाही जेणेकरून आपण पोलिसांच्या हाती लागणार नाही यासाठी प्रयत्न करत होता. तर पोलीस नाईक उगले यांना पोहता येत नसल्याने त्यांच्या नाकातोंडात पाणी जात होते. जिवाच्या आकांताने ते ओरडत होते. पोलीस पथक शेतामध्ये आरोपीचा शोध घेत होते. तितक्यात आवाज ऐकू आला. खरेतर, पथकातील पोलिसांना आरोपी व पोलिसात झटापटी झाली अशी शंका होती. ते आवाजाच्या दिशेने पळाले. जवळ जाऊन पाहता पोलीस नाईक सचिन उगले हे विहिरीत पडल्याचे दिसले. त्यानंतर जवळच असणार्या वस्तीवरील लोकांचा आधार घेऊन मोठे दावे विहिरीत टाकले आणि आरोपी प्रशांत गागरे व पोलीस नाईक सचिन उगले या दोघांना बाहेर काढले. दोघांनाही पुढील उपचारांसाठी रुग्णलयात दाखल केले. सदर आरोपी शोधण्यासाठी हेडकॉन्स्टेबल अमित महाजन, आशिष आरवडे, पोना. सचिन उगले, बाबासाहेब शिरसाठ यांनी परिश्रम घेतले.