बेशिस्त शाळांवर कारवाईचे व कॉपीला प्रोत्साहन देणाऱ्या घटकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

0
36

वॉररूममधूनच जिल्हाधिकाऱ्यांनी केली सुमारे 1000 परीक्षा केंद्रांची मॉनिटरिंग

बेशिस्त शाळांवर कारवाईचे व कॉपीला प्रोत्साहन देणाऱ्या घटकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

ऑनलाइन सूचनांनी बोर्ड परीक्षा सुरळीत

अहिल्यानगर-

मा. मुख्यमंत्री यांच्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रम आराखडाअंतर्गत कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणातील परीक्षा राज्यात चालू असताना जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या आनंददायी परीक्षा पॅटर्न अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रूम स्थापन करण्यात आली आहे.याद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सुमारे 1000 पेक्षा अधिक केंद्रांची मॉनिटरिंग स्वतः करून पर्यवेक्षणाबाबत विविध सूचना केल्या.तासभर बसून संवेदनशील केंद्रांसह सर्वच केंद्रांच्या विविध ब्लॉक मधील लाईव्ह व्हिडिओ व सूचनांनी आढावा घेतला.नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांवर कारवाईचे प्रस्ताव तयार करण्यास सांगितले.परीक्षा केंद्राबाहेर धुडगूस घालणाऱ्या घटकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.
शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या मार्गदर्शनातून जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या मास्टर प्लॅन अंतर्गत आनंददायी परीक्षा पॅटर्नच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग सध्या हाय अलर्ट मोडवर कार्यरत आहे.ऑफलाइन पद्धतीने कॉपी मुक्तीसाठी काम करत असताना संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने देखील लाईव्ह वॉच ठेवून वॉररूम कार्यरत आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला तसेच आशिष येरेकर (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद )यांच्या दैनंदिन मार्गदर्शक सूचना समितीला दररोज प्राप्त होत आहेत.
इयत्ता दहावी व बारावीचे सर्वच पेपर वॉर रूमच्या माध्यमातून मॉनिटरिंग होत असताना 14 तालुके व अहिल्यानगर शहरातील सध्या 109 पेक्षा अधिक परीक्षा केंद्रांच्या माध्यमातून सुमारे 1000 पेक्षा अधिक ब्लॉकवर गुगल मीट ,ड्रोन कॅमेरा ,सीसीटीव्ही व केंद्र संचालकांच्या फोनद्वारे त्वरित काही मिनिटांच्या आत संपर्क साधला जात आहे.यामुळे कॉपीमुक्तीसाठी मोठ्या प्रमाणात यश लाभत आहे.
शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, बाळासाहेब बुगे (शिक्षणाधिकारी – योजना), पोलिस निरीक्षक खेडकर, आकाश दरेकर, सुरेश ढवळे,श्रीराम थोरात,लहू गिरी,जितिन ओहोळ,भावेश परमार आदी समिती सदस्य तसेच डॉ.अमोल बागूल(तांत्रिक सहकार्य) जिल्ह्यातील विविध केंद्रांवरील हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.