Home नगर जिल्हा नगर जिल्ह्यात पडताळणीपूर्वीच जिल्ह्यात 226 ‘बहिणीं’ची माघार

नगर जिल्ह्यात पडताळणीपूर्वीच जिल्ह्यात 226 ‘बहिणीं’ची माघार

0

अहिल्यानगर-पात्रता निकषात न बसणार्‍या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यासाठीची पडताळणी मोहीम राबवण्याच्या आधीच राज्यभरातून महिलांनी ‘योजना नको’ असा अर्ज करण्यास सुरूवात केली आहे. महिला व बालविकास विभागाच्या स्थानिक पातळीवरील शासकीय कार्यालयात योजनेचे लाभ थांबवण्याची विनंती करणारे अर्ज येत आहेत. नगर जिल्ह्यात देखील असे अर्ज येण्यास सुरूवात झाली आहे. तालुका पातळीवर आतापर्यंत 110 अर्ज प्राप्त झाले तर शहरी भागातून 116 असे एकूण 226 महिलांचे अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती महिला बालकल्याण विभागाच्यावतीने देण्यात आली.

दरम्यान, लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांच्या अर्जाची पडताळणी होऊन पडताळणीत अपात्र ठरल्यास मिळवलेल्या लाभाची रक्कम दंडासहित वसूल करण्यात येण्याच्या भीतीने ही ‘अर्ज माघार’ सुरू असल्याची चर्चा आहे. महायुती सरकारने गेल्या वर्षी जुलै महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. राज्यातून दोन कोटी 63 लाख महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले. दोन कोटी 47 लाख महिला पात्र ठरल्या. त्यातील दोन कोटी 34 लाख बहिणींना विधानसभा निवडणुकीअगोदर पाच महिने दरमहा दीड हजार रुपये देण्यात आले.

नगर जिल्ह्यात या योजनेत 12 लाख 20 हजार महिला योजनेत पात्र ठरल्या होत्या. या महिलांना गेल्या पाच महिन्यांत 904 कोटी रुपयांची मदत सरकारच्यावतीने करण्यात आली. योजनेचा लाभ घेतांना महिलांकडून केवळ स्वयंम घोषणापत्र घेत त्यांना योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र, राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर सरकारने योजनेत पात्र ठरलेल्या महिलांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातून हजारोच्या संख्याने महिलांनी या योजनेतून माघार घेण्यासाठी अर्ज माघार घेण्यासाठी स्थानिक पातळीवर महिला बालकल्याण विभागाकडे अर्ज करण्यास सुरूवात केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here