अहिल्यानगर-महापालिकेत नव्या होणार्या कर्मचारी भरती प्रक्रियेत 175 पैकी केवळ 45 तांत्रिक पदे भरण्यात येणार आहेत. सातवा वेतन आयोग लागू केल्यामुळे आस्थापना खर्चात झालेली वाढ व त्यामुळे होणारी आर्थिक अडचण लक्षात घेऊन, सध्या तातडीची गरज असलेली पदेच भरण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले. दरम्यान, यात अभियंता, लिपिक टंकलेखक, विद्युत पर्यवेक्षक अशी तांत्रिक पदे भरण्यात येणार आहेत.
महापालिकेतील तांत्रिक पदांच्या सुमारे 217 रिक्त जागांपैकी 175 जागा सरळ सेवाभरती प्रक्रियेव्दारे भरण्यास राज्य शासनाने मागील वर्षी मान्यता दिली होती. त्यानंतर तत्कालीन आयुक्तांनी आवश्यक असलेली 134 पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली. दरम्यानच्या काळात मनपा कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू झाल्यामुळे कर्मचार्यांचे पगार, पेन्शनचा खर्च दरमहा दोन कोटींनी वाढला. त्यामुळे निर्माण झालेली तांत्रिक अडचण लक्षात घेऊन सध्या तातडीची गरज असलेली 45 पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेच्या स्थापनेनंतरची ही पहिलीच भरती प्रक्रिया होणार असून, या माध्यमातून महापालिकेला नवीन अभियंते उपलब्ध होणार आहेत. विद्युत, पाणीपुरवठा, बांधकाम विभागात तांत्रिक कर्मचारी कमी असल्याने येणार्या अडचणी यामुळे दूर होणार आहेत. तसेच, लिपिक टंकलेखक, संगणक प्रोग्रॅमर, पशुधन पर्यवेक्षक आदी पदांवराही कर्मचारी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नागरिकांना सुविधा देण्यासाठी प्रक्रिया जलदगतीने होणार आहे.