वांबोरी – एकाचवेळी दोन बिबटे सिसीटिव्हीत दिसून आल्यानंतर चार दिवसांपासून राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात दहशतीचे वातावरण होते. वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात २४ तासांत दोन बिबटे जेरबंद झाले आहेत. एक बिबट्या शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास तर दुसरा शनिवारी रात्री आठच्या सुमारास जेरबंद झाला. या घटनेमुळे वांबोरीत बिबट्यांची संख्या नेमकी किती ? या प्रश्नावर गावभर चर्चा सुरू झाली आहे.
वांबोरीत देविदास जवरे यांच्या अंगणातून भक्ष्यासह पाच फुट उंच भिंत ओलांडून शेजारच्या मकात गेलेल्या दोन्ही बिबट्यांचे सिसीटिव्ही फुटेज गुरूवारी (१२ डिसेंबर) समोर आले होते. त्यानंतर वनविभागाने शुक्रवारी घटनास्थळी धाव घेतली. वनक्षेत्रपाल युवराज पाचारणे यांच्या आदेशानुसार, वनरक्षक एस. एस. जाधव, एम. एस. शेळके, बी. पी. जाधव यांनी मक्याच्या शेतात पिंजरा लावला. या पिंजऱ्यात कुत्र्याची पिले ठेवण्यात आली होती. या पिलांची शिकार करण्यासाठी आलेला बिबट्या शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास या पिंजऱ्यात अडकला.
शनिवारी सकाळी एक पिंजरा ठेऊन, बिबट्याला दुसऱ्या पिंजऱ्यात ठेऊन वैद्यकीय तपासणीसाठी रवाना केले. त्यानंतर शनिवारी रात्री आठ वाजता दुसरा प्रौढ बिबट्या पिंजऱ्यात अडकला. वनविभागाने या बिबट्यालाही लगेच रवाना करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, दुसरा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्यानंतर या पिंजऱ्याभोवती रात्री तिसरा िबबट्या घुटमळला. वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद बिबट्याच्या डरकाळीने परिसर दणाणून गेला.
जेरबंद बिबट्याला एका पिंजऱ्यातून दुसऱ्या पिंजऱ्यात स्थलांतरीत करण्यासाठी वनविभागाने आणखी एक पिंजरा आणला होता. त्याचवेळी बघ्यांचीही मोठी गर्दी जवरे यांच्या निवासस्थानी उसळली होती. वनकर्मचाऱ्यांनी दोन्ही पिंजऱ्यांचे दरवाजे समोरासमोर लावून शिथापीने दारे उघडून बिबट्या दुसऱ्या पिंजऱ्यात घेतला. त्याचवेळी बिबट्याच्या डरकाळ्यांचा आवाज असा थरार वांबोरीकरांनी अनुभवला.
एक प्रौढ तर एक लहान बिबट्या वैद्यकीय तपासणीत शुक्रवारी पकडलेला बिबट्या अवघ्या सात महिन्यांचा नर असल्याचे समोर आले. त्यानंतर शनिवारी रात्री अडकलेला दुसरा बिबट्या मात्र, प्रौढ आहे. ही मादी असावी, असा अंदाज आहे. परंतु, वैद्यकीय तपासणीनंतरच दुसऱ्या बिबट्याचे वय समोर येईल. दरम्यान, आणखी काही दिवस पिंजरा ठेवण्याची मागणी होत आहे. याबाबत वनविभागच अंतिम निर्णय घेणार आहे.