नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांमध्ये दोन नंबरची मते मिळवून काही मतांनी पराभूत झालेल्या उमेदवारांना प्रति आमदार म्हणून संधी मिळावी यासाठी लोकशाही संरक्षण कायदा आणण्याचा आग्रह पीपल्स हेल्पलाईन संघटनेने धरला आहे. यासाठी महाराष्ट्रातील समविचारी वकिल प्रयत्नशील आहेत.
महाराष्ट्रातील 288 मतदार संघामध्ये दोन नंबरला राहिलेल्या सर्वच उमेदवारांची आम लोकशाहीपाल म्हणून त्यांच्या मतदारसंघात जनतेच्या साक्षीने शपथविधी करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. भारतातील संसदीय लोकशाही दिव्यांग लोकशाही असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. कारण पराभूत झालेल्या उमेदवारांना पुढील पाच वर्ष जनतेच्या वतीने काम करण्याची संधी बऱ्याच वेळेला नाकारली जाते. त्यामुळे पराभूत उमेदवाराला मतदान करणारे निराश झालेले लोक अडगळीला पडतात. त्यामुळे माजी मुख्यमंत्री शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व माजी मंत्री बच्चू कडू यांच्याशी चर्चा करून पराभूत उमेदवारांना प्रति आमदार म्हणून आम लोकशाहीपाल म्हणून काम करण्यासाठीचा प्रस्ताव ठेवला जाणार असल्याचे ॲड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे.
पूर्वी पासूनच भारतीय समाजामध्ये आर्थिक आणि सामाजिक विषमता जोपासली गेली. त्यातून दिव्यांग समाज निर्माण झाला आहे. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत 288 जागा बाबत मतदार अक्कलमारी मोठ्या प्रमाणात झाली. त्याचबरोबर ईव्हीएम मशीनचा देखील गैरवापर झाला आहे, अशी शंका निर्माण झालेली आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरात आणि बच्चू कडू यांसारख्या उमद्या लोकांना अनपेक्षित पराभवाला तोंड द्यावे लागले. परंतु जनतेचे प्रश्न पुढील पाच वर्ष सातत्याने सरकार पुढे मांडण्यासाठी आणि त्याच वेळेला निवडून आलेल्या आमदारावर लक्ष ठेवण्यासाठी अशा लोकशाहीपालची अत्यंत गरज असल्याचे संघटनेने भूमिका व्यक्त केली आहे.
आम लोकशाहीपाल कार्यपद्धतीमुळे भारतातील दिव्यांग संसदीय प्रणाली मोडीत निघून कोट्यावधी मतांचा आदर होऊ शकेल. कारण निवडून आलेल्या उमेदवारापेक्षा पराभूत उमेदवाराला फक्त 5 किंवा 25000 मते कमी पडलेली आहे.ज्यांनी मते दिली, परंतु उमेदवार पराभूत झाला अशा मतदारांना पुढील पाच वर्षे आधार देण्यासाठी आणि त्यांची कामे करण्यासाठी आमलोकशाहीपाल उपयुक्त ठरणार आहे. निवडून आलेल्या आमदाराने किंवा त्यांच्या पक्षाने जनतेला दिलेल्या आश्वासनाच्या पूर्ततेसाठीसुद्धा लोकशाहीपाल वचक ठेवण्याचे काम करणार आहे. जनतेची कामं करून आणि सरकारवर दबाव तंत्राचा वापर करण्यासाठी अशा यंत्रणेची फार मोठी गरज असल्याचे म्हंटले आहे. या संकल्पनेला नगर मधील वकीलांनी सक्रिय पाठिंबा जारी केला आहे.
पराभूत झालेल्या उमेदवारांना प्रति आमदार म्हणून संधी मिळावी
- Advertisement -