निकाल काही असला तरी सक्षम विरोधक म्हणून लढणार : किरण काळे ;
थोरात यांचा पराभव वेदनादायी, काँग्रेस कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून कामाला लागावे
—————————————————–
अहिल्यानगर : लोकशाहीत हार जीत ही सुरूच असते. राष्ट्रवादीच्या निलेश लंके यांना खासदार करण्यामध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची किंगमेकर म्हणून भूमिका राहिली. लंकेच्या विजयासाठी शहर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले. शहर मतदासंघांतील विधानसभा निवडणुकीत देखील काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. झालेल्या पराभवाचं आम्ही काँग्रेस म्हणून नक्कीच आत्मचिंतन करू. माञ निकाल काही ही असला तरी नगरकरांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सक्षम विरोधक म्हणून मी आणि शहरातील काँग्रेस कार्यकर्ते सक्षमपणे, निर्भीडपणे लढत राहू असे प्रतिपादन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.
काँग्रेसच्या माथाडी विभागाचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे यांच्या अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम किरण काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष उषा भगत, शहर जिल्हा उपाध्यक्ष शैलाताई लांडे सामाजिक न्याय युवा आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष गौरव घोरपडे, शहर जिल्हा सचिव रोहिदास भालेराव, क्रीडा व युवक काँग्रेस विभाग शहर जिल्हाध्यक्ष आकाश आल्हाट, युवक उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे, युवक सरचिटणीस आनंद जवंजाळ, केडगाव काँग्रेसचे किशोर कोतकर, जयराम आखाडे आदी उपस्थित होते.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अहिल्यानगर शहर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा सुमारे चाळीस हजार एवढ्या मोठ्या मतांच्या फरकाने दारुण पराभव झाला. त्यानंतर पहिल्यांदाच काळे बोलत होते. ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत शहरातील सर्वच काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिवस-रात्र मेहनत घेतली. विरोधकांना अंगावर नाही तर शिंगावर घेतलं. सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचं मी कौतुक करतो. आभार मानतो. शहर मतदारसंघ काँग्रेस पक्षाला सुटावा असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. जागा घेण्याबाबत बाळासाहेब थोरात यांनी जाहीर सूतोवाच देखील केले होते. माञ दुर्दैवाने अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात एकही जागा महाविकास आघाडीच्या जागा वाटपा मध्ये काँग्रेसच्या वाट्याला आली नाही. यामुळे पक्षाला संधीच न मिळाल्याने संघटनात्मक मोठ नुकसान झालं.
आगामी काळात देखील या संघर्षाची धार जरा देखील कमी होणार नाही. या उलट नवीन रूपात, अधिक आक्रमकपणे, आम्ही नगरकरांच्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरण्या करिता सदैव तत्पर असू.
कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून कामाला लागावे :
संयमी व सुसंस्कृत नेतृत्व म्हणून सबंध महाराष्ट्राला परिचित असणाऱ्या, सलग आठ वेळा जनतेच्या आशीर्वादाने लोकप्रतिनिधी असणाऱ्या बाळासाहेब थोरात यांचा झालेला पराभव हा काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी अत्यंत धक्कादायक व वेदनादायी आहे. मात्र स्वतः थोरात हे खचून न जाता पराभवा नंतर लगेचच घराबाहेर पडले असून दररोज जनतेत आहेत. शहर काँग्रेस कार्यकर्त्यांनी देखील यातून प्रेरणा घेत पुन्हा एकदा पक्ष संघटना मजबूत करत समाजातील प्रत्येक घटकापर्यंत जावे. मरगळ झटकून कामाला लागावे, असे आवाहन किरण काळे यांनी केले आहे.
—