नगर शहरातील महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून निर्माण झालेला गोंधळ बुधवारी सायंकाळपर्यंत कायम होता.नगर शहरातील विधानसभेची निवडणूक रंगतदार होणार असे चित्र रंगवण्यात येत असतांना कोतकरांनी एकदम माघार घेतल्याचे वृत्त समोर आले. मात्र, त्यानंतर महाविकास आघाडीचा नगर शहरातील उमेदवार कोण हे स्पष्ट झाले नव्हते.
दरम्यान, उमेदवारी जाहीर होवून अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी आणि समर्थकांनी निवडणुकीचे काम सुरु केल्यानंतर देखील नगरमध्ये त्यांचा प्रतिस्पर्धी उमेदवार कोण हे स्पष्ट नसल्याने मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.
मविआच्या जागा वाटपात नगर शहराची जागा मशाल लढवणार की तुतारी याचा फैसलाच अजून झालेला नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांचे इच्छुक हवालदिल झालेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.अशा वेळी विलंबाने उमेदवारी जाहीर झाली तरी प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळेल की नाही अशीही शंका आहे. मध्यंतरी मविआकडून माजी महापौर संदीप कोतकर यांनी जोरदार वातावरण निर्मिती केली. मात्र आता तेही रिंगणात नसतील तर विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना मविआकडून अप्रत्यक्ष रित्या ‘बाय’ दिला की काय अशीही चर्चा रंगली आहे.