नगर शहरात ठाकरेंची ‘मशाल’ टिकणार कशी? अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा ‘धनुष्यबाणा’कडे ओढा

0
32

नवीन वर्षात महानगरपालिका निवडणुका होण्याची शक्यता असल्याने अहिल्यानगर शहरात राजकीय घडामोडी सुरु झाल्या आहेत. या निवडणुका महाविकास आघाडी तसेच महायुतीतील घटक पक्ष स्वतंत्रपणेच लढण्याची शक्यता असल्याने इच्छुकांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यात अहिल्यानगर शहरात शिवसेनेत मोठी घडामोड घडली असून ठाकरेंच्या शिवसेनेतील माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून धनुष्यबाण हाती घेतले आहे. शिंदे सेनेचे शहराध्यक्ष सचिन जाधव, अनिल शिंदे यांनी ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांशी संपर्क साधत त्यांना पक्षात प्रवेश मिळवून दिला. प्रशांत गायकवाड, दत्ता जाधव, दीपक खैरे यांच्यासह माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनीही ठाकरेंचे शिवबंधन काढून टाकले आहे.
jadhav

विधानसभा निवडणुकीपासून शहरातील ठाकरेंच्या शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली आहे. विधानसभेची शहराची जागा महाविकास आघाडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडण्यात आली. नगर शहर शिवसेनेचा बालेकिल्ला असताना ही जागा सोडण्यात आल्याने पदाधिकारी नाराज झाले होते. त्यावेळी उघडपणे पक्ष नेतृत्वावर टिका करण्यात आली. विशेषत: खा.संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. तेव्हापासून ठाकरे गटाला खिंडार पडणार असल्याची चर्चा होती. आता टप्प्याटप्प्याने ठाकरेंचे शिलेदार शिंदेंच्या गोटात दाखल होणार असून त्याची सुरुवात जाधव, गायकवाड यांनी केली आहे. त्यामुळे ठाकरेंच्या सेनेला शहरात अस्तित्वासाठी झगडावे लागेल अशीच चर्चा सुरु झाली आहे.
jadhav11
शिवसेना दुभंगल्यानंतरही अनेक जुन्याजाणत्या पदाधिकारी, नगरसेवकांनी ठाकरेंशी एकनिष्ठ राहून पक्षाचे प्रामाणिकपणे काम केले. परंतु, नेतृत्वाकडून अपेक्षित प्रतिसाद, पाठबळ आणि ताकद मिळत नसल्याने नाराजीची भावना वाढत चालली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर तर शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांनीही शहराकडे पाठच फिरवली आहे. पक्षाचे नेतृत्वच कार्यक्रम देत नसल्याने सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदेंकडे नाराजांचे पावले आपसूक वळू लागले आहेत. राज्यातही ठाकरेंच्या सेनेची मोठी पडझड झाली आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी 57 आमदार निवडून आणत खरी शिवसेना कोणाची हे दाखवून दिले आहे. या परिस्थितीत ठाकरेंकडे असलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मनात चलबिचल निर्माण झाली आहे. विरोधात राहून संघर्ष करण्यापेक्षा जनमताचा कौल लक्षात घेवून सत्तेतील पक्षात जावे याच धोरणातून नगर शहरातून ठाकरे सेनेचे नगरसेवक शिंदेंकडे जात आहे. ही गळती रोखण्यासाठी ठाकरे गटाकडून कोणते प्रयत्न होतात व कार्यकर्त्यांना कितपत विश्वास दिला जातो या गोष्टींवरच ठाकरेंच्या सेनेचे नगर शहरातील भवितव्य अवलंबून राहणार आहे.