कुकाणे : ग्रामसभा ठराव अन्वये शुक्रवार शिवीगाळ केल्यास ५०० रुपये दंड ठरविण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी करत गावातील भांडणात शिव्या देणाऱ्या दोन व्यक्तींना दंड केल्याचे सरपंच शरद आरगडे यांनी सांगितले.सौंदाळा गावचा शिवीगाळ केल्यास ५०० रुपये दंड करण्याचा ठराव सोशल मीडिया व वर्तमानपत्राच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यासह देशात प्रसिद्ध झाला आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीने केलेल्या दंडास महत्त्व प्राप्त झाले आहे. गावातील शांताराम आढागळे व ठकाजी आरगडे यांच्यात शेतीच्या बांधावरून वाद झाले. तेव्हा त्यांनी एकमेकांना शिव्या दिल्या. सकाळी सरपंच शरद आरगडे यांनी सदर वादाचा मुद्दा असलेल्या बांधावर जाऊन त्यांना बांधावर पोल उभे करण्याचे सांगून वाद मिटवला.
यावेळी दोघांनीही एकमेकांना शिव्या दिल्याचे प्रामाणिकपणे मान्य करून ग्रामपंचायतीचा ५०० रुपये दंड भरला. ग्रामपंचायतीने त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करून यापुढे शिव्या देऊन स्त्रियांचा अपमान न करण्याचा सल्ला देऊन बांध भाऊ म्हणून गोडीगुलाबीने राहण्याचे सांगितले.दंड भरून यापुढे शिवीगाळ करणार नसल्याचे ठकाजी व शांताराम यांनी म्हटले आहे. या वेळी ग्रामसेवक प्रतिभा पिसोटे यांनी दंड रक्कम ग्रामनिधी भरणार आहे. या रकमेतून शिवीगाळ न करण्यासाठी प्रबोधन व्हावे, म्हणून फ्लेक्स बोर्ड डकवणार असल्याचे सांगितले.