Saturday, January 25, 2025

ध्वजदिन निधीचे विक्रमी संकलन करत अहिल्यानगरचा राज्यात प्रथम क्रमांक

राजभवन येथील समारंभात राज्यपालांच्या हस्ते जिल्ह्याचा सन्मान

अहिल्यानगर दि.७- जिल्ह्याने ध्वजदिन निधीचे विक्रमी संकलन करत राज्यात प्रथम क्रमांकाची कामगिरी केल्याने राजभवन येथे आयोजित सेना दिवस कार्यक्रमात राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन जिल्ह्याचा सन्मान करण्यात आला. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्यावतीने जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्क्वॉड्रन लिडर वि.ल. कोरडे (निवृत्त) यांनी हा पुरस्कार स्विकारला.

भारतीय सैन्यदल हे आपल्या देशाचा अभिमान असून देशाच्या संरक्षणाबरोबरच नैसर्गिक आपत्तींच्या काळातही आपले सैन्यदल अत्यंत अमूल्य सेवा बजावते. भारताच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राण अर्पण केले अशा जवानांच्या कुटुंबीयांच्या जीवनातील अडीअडचणी दूर करून त्यांचे जीवन सुसह्य होण्यासाठी, युद्धात अपंगत्व तसेच सेवा निवृत्त झालेल्या जवानांच्या पुर्नवसनाकरिता सशस्त्र सेना ध्वज निधीला सर्वांनी जास्तीत जास्त योगदान देण्याचे अवाहन श्री. सालीमठ यांनी गतवर्षी केले होते. त्याला जिल्ह्यातील विविध शासकीय विभाग, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

जिल्ह्यातील सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालये, महामंडळे, सहकारी संस्था, धार्मीक संस्था, कृषी विद्यापीठ, राज्य परिवहन महामंडळ आणि नागरिकांनी ५ कोटीहून अधिक ध्वजदिन निधी संकलन करण्यात भरीव योगदान दिले. यात शिर्डी साई संस्थान, जिल्हा परिषद, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, महानगरपालिका, नगरपालिका आणि पोलीस विभागाने सर्वाधिक योगदान आहे.

अहिल्यानगर जिल्ह्याने रु. १ कोटी ८४ लाख ९८ हजार उद्दिष्ट असतांना रु. ५ कोटी ८ लाख ६८ हजार ३०८ एवढा अर्थात २७५ टक्के निधी संकलित केला. लातूर ४२ लाख २२ हजार उद्दिष्ट असतांना ९७ लाख, नागपूर १ कोटी ९१ लाख ९८ हजार उद्दिष्ट असतांना ३ कोटी ९ लाख ७७ हजार, अमरावती १ कोटी १० लाख उद्दिष्ट असतांना १ कोटी ३८ लाख ८० हजार आणि कोल्हापूर जिल्ह्याने रु.१ कोटी ६० लाख ७९ हजार उद्दिष्ट असतांना रु.२ कोटी एवढा निधी संकलित केला आहे. अहिल्यानगर जिल्ह्याची कामगिरी सर्वोत्तम ठरली आहे.

या कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी सालीमठ यांनी जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख, अधिकारी,कर्मचारी आणि नागरिकांना धन्यवाद देत त्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles