नगरमध्ये पुन्हा राजकीय भूकंप ! बाळासाहेब बोराटे यांनी घेतली उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट,म्हणाले…

0
64

अहिल्यानगर -आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मागील महिन्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या तीन नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. आणखी काही नगरसेवक नगरसेवक व काही पदाधिकारी पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. शहरप्रमुखांसह नऊ नगरसेवकांनी शनिवारी सायंकाळी ठाणे येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन प्राथमिक चर्चाही केली.

विधानसभा निवडणुकीत अहिल्यानगर शहरातील विधानसभा मतदारसंघाची हक्काची जागा सोडल्याने ठाकरे गटाच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. निवडणूक काळात पक्षाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे नाराज असलेले नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे. शनिवारी शहरप्रमुख संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, संजय शेंडगे, श्याम नळकांडे, सचिन शिंदे, संतोष गेनाप्पा, परेश लोखंडे, संग्राम कोतकर, बबलू शिंदे यांनी ठाणे येथे जाऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. काहींचा अपवाद वगळता जवळपास सर्व नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत.

पुढील आठवड्यात तारीख व वेळ निश्चित करून प्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याचे काही नगरसेवकांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, आम्ही काही नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे येथे भेट घेतली. शिंदे गटातील पक्ष प्रवेशाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, असे शहरप्रमुख संभाजी कदम यांनी सांगितले. बाळासाहेब बोराटे यांनी मात्र पक्ष सोडणार असून, शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले. ठाकरे गटातील वरिष्ठ नेत्यांच्या सोयीस्कर राजकारणाच्या भूमिकेला कंटाळून आम्ही पक्ष सोडत असल्याचे बोराटे यांनी सांगितले.