अहिल्यानगर -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार नगर सर्वशासकीय विभागात 100 दिवसाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यानूसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत असणार्या गुरूजीसह विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समित्यासाठी 100 दिवसांचा दहा कलमी कार्यक्रम आखला आहे. या कार्यक्रमात हलगर्जी करणार्या, कार्यक्रमात दिरंगाई करणार्यांवर अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षकांवर थेट शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आधीच अध्यापनासह अन्य कामामुळे मेटाकुटीला आलेल्या शिक्षकांवर आता दहा कलमी कृती कार्यक्रमाचा भार पडला आहे. यामुळे शिक्षकांमध्ये काहीचा नाराजीचा सूर आहे. मात्र, 100 दिवसांचा कार्यक्रम राज्य पातळीवरून निश्चित करण्यात आलेला असल्याने सर्वांना तो पार पाडावा लागणार आहे. या दहा कलमी कार्यक्रमाबाबत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व अधिकार्यांना सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने 15 एप्रिलपर्यंत दहा कलमी कार्यक्रम आखला आहे. यात महाराष्ट्र गीताची अंमलबजावणी सक्तीची करण्यात आली असून सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांच्यावर याबाबत जबाबदारी सोपविण्यात आली आह. तसेच ‘अध्यापनासाठी मुबलक वेळ’ या उपक्रमात शैक्षणिक कामे वगळून शिक्षकांच्या अडीअडचणीचे निराकरण करून त्यांना अध्यापनासाठी मुबलक वेळ उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. या कामाची जबाबदारी सर्व गटशिक्षणाधिकारी तसेच नगरपालिका व नगरपरिषदांचे प्रशासन अधिकारी यांच्या देण्यात आली आहे.
या 100 दिवसांच्या कार्यक्रमात जिल्ह्यात नाविन्यपूर्ण योजनेत क्षेत्रिय पातळीवरील कार्याचा गौरव करण्यात येणार आहे. यासाठी मुख्याध्यापक केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनी पुढाकार घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शैक्षणिक धोरणात विद्यार्थी, पालक, शिक्षक, व्यवस्थापन समिती, शैक्षणिक संस्था यांच्या सकारात्मक मुद्द्यावर चर्चा करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच मराठी अभिषेक भाषा असून की सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये अनिवार्य करण्यात आली आहे. यासाठी शाळेतील शिक्षक, अधिकारी यांनी लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे. सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून शाळांचा विकास करण्यास सांगण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शाळा व्यवस्थापन समिती सक्षम करण्यासाठी पालक व नागरिकांचा सहभाग वाढवावा. विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी व पोषण आहार योजना प्रभावीपणे राबवावी. मिनी अंगणवाडी, इंग्रजी शाळा, क्लास यांच्या शुल्कावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना याच कार्यक्रमात देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व आनंददायी मिळावे, यासाठी प्रयत्न करण्यासही सांगण्यात आले आहे.
राज्य सरकारच्या 100 कलमी कार्यक्रमात जिल्ह्यातील शाळांमध्ये रिक्त असणारे पदांची भरती करण्यासाठी जलद गतीने प्रक्रिया राबवण्याची सूचनाही देण्यात आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात शिक्षण विभाग 100 दिवसात दहा कलमी कृती कार्यक्रम राबवणार असून या कार्यक्रमाचा फलनिष्पत्ती अहवाल सादर करण्याचे सांगण्यात आले आहे. या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष करणार्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर थेट शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषद शिक्षण विभागाने दिले आहेत.
शंभर दिवसाचा 10 कलमी कार्यक्रम राबवण्यासाठी शिक्षण विभागाने सनियंत्रण अधिकारी यासह नोडल अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. यात उपशिक्षणाधिकारी मीना शिवगुंडे, राजश्री घोडके, विस्तार अधिकारी राधाकिसन शिंदे, भाऊसाहेब साठे, विलास साठे, सुनील शिंदे, जयश्री कार्ले, सहाय्यक प्रशासन अधिकारी संभाजी भदगले, लिपीक संदीप काळे, संतोष साठे, संदीप तमनर, प्रसाद पोळ, जबीन शेख, महेश थोरात, श्रध्दा मोरे यासह अन्य अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला आहे.