वार्षिक परिक्षा आली तरी विद्यार्थी पुस्तकाविनाच
–संबंधित अधिका-यांवर कठोर कारवाई करावी-जालिंदर वाकचौरे —
अहिल्यानगर : प्रतिनिधी फेब्रुवारी संपत आला.आता वार्षिक परिक्षा तोंडावर आल्या.अजूनपर्यंतही जिल्ह्यातील अनेक जि.प.प्राथमिक शाळांच्या इयत्ता 1 ली ते 7 वी च्या विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके मिळाली नाहीत.जि.प.प्राथमिक शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत अडसर ठरणा-या संबंधित शिक्षण विभागातील अधिका-यांवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी केली आहे.
महाराष्ट्र शासन आणि जिल्हा परिषद शासकीय शाळा टिकून गोरगरीबांच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी प्रयत्न करीत असताना शासनाच्या याच विभागातील अधिका-यांचे खासगी शाळांनी असलेल्या आर्थिक साटेलोट्यातून गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे.शैक्षणिक वर्ष संपत आले तरी जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना अद्यापही क्रमिक पुस्तके मिळाली नसल्याने त्यांना परिक्षेसाठीचा अभ्यास कसा करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र शासनाचे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्व पदाधिकारी मराठी मुलांच्या शाळा टिकाव्यात म्हणून प्रयत्नशील असतात.याउलट शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे वर्तन आहे.बदली किंवा शैक्षणिक खरेदी आदींबाबत सजग असणारे अधिकारी मराठी मुलांच्या शैक्षणिक वाटचालीत मात्र अडथळा निर्माण करीत असल्याचे चित्र आहे.कारण इतर बाबतीत भ्रष्ट अर्थकारणाचा विचार करणा-या या अधिका-यांना गोरगरीबांच्या शिक्षणाशी काहीही देणेघेणे नाही.
मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तके नाहीत.सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांना मराठी पुस्तके असा हा सावळा गोंधळ आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांचेकडे आपण याबाबत लेखी तक्रार देणार असून गोरगरीब मुलांच्या शैक्षणिक वाटचालीत मुद्दामहून संकटे निर्माण करणा-या शिक्षण विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करणार असल्याचे जालिंदर वाकचौरे म्हणाले.
जि.प.प्राथमिक शाळांना कायद्याचा कठोर बडगा दाखवून शिक्षकांना वेठीस धरणारे शिक्षण खात्यातील अधिकारी खाजगी शाळांच्या बाबतीत मेणाहून मऊ वर्तन करतात.या खाजगी शाळांची कुठलीही तपासणी हे अधिकारी करीत नाहीत.खाजगी शाळेत शिकाणा-या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, विद्यार्थ्यांचा आहार,त्यांची होणारी आर्थिक पिळवणूक,बोगस आणि विनाप्रशिक्षित शिक्षक याबाबतची तपासणी हे अधिकारी कधीही करीत नाहीत.महिन्याकाठी मोठे आर्थिक घबाड खाजगी संस्था चालकांकडून अधिका-यांना मिळत असल्याने या शाळा आणि मराठी शाळा या दोन्हीकडील विद्यार्थ्यांचे नुकसान करण्याचा विडा या अधिका-यांनी उचलला आहे.अहिल्यानगर जिल्ह्यातील या अधिका-यांची नावेही मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांकडे देणार आहोत.
जालिंदर वाकचौरे
महाराष्ट्र भाजपा प्रदेश सदस्य