मुलगी झाली म्हणून व कार घेण्यासाठी माहेरहून पाच लाख आणण्यासाठी विवाहितेचा सासरी छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. डोंगरगण (ता. नगर) येथे माहेरी राहणार्या पीडित विवाहितेने याप्रकरणी मंगळवारी (दि. २८) दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती प्रशांत निवृत्ती शिंदे, सासू रंजना निवृत्ती शिंदे, सासरे निवृत्ती ठकुजी शिंदे, भाया विशाल निवृत्ती शिंदे (सर्व रा. गुंजाळवाडी ता. जुन्नर, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सदरचा प्रकार ७ सप्टेंबर २०२३ पासून ते २७ डिसेंबर २०२३ दरम्यान वेळोवेळी गुंजाळवाडी (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे घडला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीचा विवाह प्रशांत सोबत झाला आहे. विवाहनंतर फिर्यादी सासरी नांदत असताना त्यांना एक मुलगी झाली. दरम्यान पती प्रशांत, सासू रंजना, सासरे निवृत्ती, भाया विशाल यांनी मुलगी झाली, आम्हाला मुलगा पाहिजे होता. तसेच कार घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रूपये घेऊन ये असे म्हणून वेळोवेळी शिवीगाळ, दमदाटी केली. मारहाण करून मानसिक व शारिरीक छळ केला. मानसिक त्रास दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार थोरवे करत आहेत.