अहमदनगर : जिल्हा रुग्णालयातून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात अनेकजण सामील असण्याची शक्यता आहे. बारगजे नावाच्या एजंटने दोघांना बनावट प्रमाणपत्र काढण्यासाठी रुग्णालयात पाठविले होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. तोफखाना पोलिस बारगजे याचा शोध घेत आहेत. जिल्हा रुग्णालयात बुधवारी शुभम तरटे नावाच्या व्यक्तीचे दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी अशोक यादव नावाची दिव्यांग व्यक्ती डॉक्टरांसमोर गेली. त्याला साथ देण्यासाठी राहुल आभाळे हाही सोबत होता. आधारकार्डवर फोटो यादवचा व नाव तरटेचे असे बनावट आधाारकार्ड त्यांनी डॉक्टरांना दाखविले. तरटे याचे प्रमाणपत्र काढावयाचे असताना तो रुग्णालयात आलाच नव्हता. डॉक्टरांना शंका आल्याने तपासणी केली असता या बनावटगिरीचा भंडाफोड झाला. पोलिसांनी यादव व आभाळे विरुद्ध गु्न्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांना बारगजे नावाच्या व्यक्तीने हे बनावट प्रमाणपत्र काढण्यास सांगितले होते. त्यामुळे पोलिस बारगजे याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी तरटे यालाही या गुन्ह्यात आरोपी केले आहे. दिव्यांग प्रमाणपत्र काढण्याचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे.
जिल्हा रुग्णालयातून अनेक धडधाकट सरकारी कर्मचाऱ्यांनी दिव्यांग प्रमाणपत्रे मिळविली आहेत. ज्या व्यक्तीचे प्रमाणपत्र काढायचे त्याच्याऐवजी पैसे देऊन दुसरीच खरी दिव्यांग व्यक्ती डॉक्टरांसमोर उभी करून वैद्यकीय चाचण्या करायच्या व धडधाकट व्यक्तीच्या नावे प्रमाणपत्र काढायचे असे प्रकार होत असावेत, अशी शंका या गुन्ह्यामुळे निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा किती टोळ्या आहेत व आणखी किती प्रमाणपत्रे या पद्धतीने काढली गेली? अशी शंका यातून निर्माण झाली आहे. पोलिस या दृष्टीनेही तपास करीत आहेत.
जिल्हा रुग्णालयात दाखल गुन्ह्यामुळे जिल्हा परिषदेत घबराट पसरली आहे. जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य विभाग, महिला बालकल्याण अशा अनेक विभागातील दिव्यांग प्रमाणपत्रांबाबत तक्रारी आहेत. जिल्हा परिषदेने सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्रांची पडताळणी करून आणण्याचा आदेश केला आहे. मात्र, अनेक कर्मचारी मुदत संपल्यानंतरही तपासणीस टाळाटाळ करीत आहेत. कर्मचारी तपासणीस टाळाटाळ का करत आहेत? यावरून शंका निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद अशा प्रकरणात काय भूमिका घेणार याबाबतही उत्सुकता आहे.