नगर – यावर्षी पाऊस कमी झाल्याने शेतातील पिक उत्पादन घटले. त्यातच डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर कसा कमी होणार या विवंचनेत असलेल्या एका ४६ वर्षीय शेतकऱ्याने नैराश्यातून राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना नगर तालुक्यातील साकत या गावात शुक्रवारी (दि.२७) सकाळी घडली. सुखदेव गोविंद चितळकर (रा. मल्हारवाडी, साकत, ता.नगर) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
चितळकर यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याचे त्यांच्या कुटुंबियांच्या सकाळी निदर्शनास आले. त्यांनी तसेच परिसरातील नागरिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांनी आत्महत्येपूर्वी एक चिट्ठी लिहून ठेवली असून त्यात कर्जबाजारी पणाला कंटाळून आपण आपले जीवन संपवत आहोत. असा उल्लेख केलेला असल्याचे गावात बोलले जात आहे. याबाबत नगर तालुका पोलिसांशी संपर्क साधला असता एक सुसाईड नोट सापडली असून त्याबाबत अधिक तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.
याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस अंमलदार रमेश गांगर्डे हे करीत आहेत. मयत चितळकर यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, तीन भाऊ असा परिवार आहे.
अहमदनगर तालुक्यातील शेतकऱ्यांनं उचललं टोकाचं पाऊल….सुसाईड नोट!
- Advertisement -